मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त  विद्यापीठात भरगच्च कार्यक्रम 

विद्यार्थ्यांना मिळणार लेखकांशी संवादाची संधी 

नांदेड (प्रतिनिधि)-मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पंधरा दिवस विविध वाङ्मयीन व भाषिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन आठवडे चालणाऱ्या ‘उत्सव मराठी भाषेचा’ या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शन, कथाकथन, नाट्यवाचन, व्याख्यान, मुलाखत, परिसंवाद, ज्येष्ठ लेखकांचे सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने विद्यार्थी व साहित्य रसिकांना ज्येष्ठ लेखकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी दिली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पंधरवड्याचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करून करण्यात आले. १७ जानेवारी रोजी ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राम तरटे, भारत दाढेल, स्वाती कान्हेगावकर हे कथाकथन करणार आहेत. दि. १९ जानेवारी रोजी सुमन केशरी यांच्या ‘गांधारी’ या नाट्यसंहितेचे अभिवाचन ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे प्राध्यापक व विद्यार्थी करणार आहेत. शिक्षणशास्त्र संकुलातील डॉ. महेश जोशी अभिवाचन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.  तर २२ जानेवारी रोजी केंद्रीय संस्कृत विद्यापीठातील मराठीच्या प्रा. डॉ. मीनाक्षी ब-हाटे यांचे ‘सूचीशास्त्राचे महत्व’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संशोधक विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान उपयुक्त असून आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर अध्यक्षस्थानी राहणार आहेत. दि. २४ जानेवारी रोजी नव्या पिढीतील कादंबरीकारांशी मुक्तचर्चा आयोजित करण्यात आली कादंबरीकार मनोज बोरगावकर (नदीष्ट), महेश मोरे (गावपांढरी), डॉ. पी. विठ्ठल (संभ्रमाची गोष्ट) आणि अशोक कुबडे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी अध्यक्षस्थानी असतील. दि. २७ जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप ‘आदिवासी साहित्य: सद्यस्थिती’ विषयावरील परिसंवादाने होणार आहे. भाषा संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील. डॉ. विनोद कुमरे व डॉ. वैजनाथ अनमुलवाड  विषय मांडणी करतील. यावेळी ज्येष्ठ कवी माधव चुकेवाड व नांदेड जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर वाडेवाले यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल, ललित व प्रयोगजीवी कला संकुल तसेच ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमांचे विद्यापीठ परिसरात आयोजन करण्यात आले असून संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत. सदरील कार्यक्रमांचा साहित्य रसिकांनी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *