सण-उत्सवात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत

नांदेड (जिमाका) – ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोते गृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2024 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या 15 दिवसांत ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केली आहे.

या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 173 / 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये माळेगाव यात्रा, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन 1 मे, 2 दिवस गणपती उत्सव (पहिला दिवस व अनंत चर्तुदर्शी), नवरात्री उत्सव (पहिला दिवस व अष्टमी व नवमी) दिवाळी (लक्ष्मीपूजन), ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबर, उर्वरित 2 दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल.

या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर मा. उच्च न्यायालयाने दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *