नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त मुख्य लिपीकाविरुध्द आपल्या कायदेशीर उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा 43.37 टक्के जास्तीची अपसंपदा सापडली म्हणून गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या दरम्यान घर झडतीमध्ये त्या घरात 1 कोटी 17 लाख 29 हजार 600 रुपयांचे वेगळे घबाड सापडले होते. नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी या प्रकरणातील दोन्ही पती-पत्नी आरोपींना जामीन नाकारला आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्यात संकेतनगर, भावसार चौक तरोडा खुर्द येथे राहणारे सुर्यकांत रुखमाजी कावळे (60) आणि त्यांच्या पत्नी सौ.मिना सुर्यकांत कावळे (55) या दोघांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा क्रमांक 5/2024 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल केला होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले मुख्य लिपीक सुर्यकांत कावळे यांची 1999 ते 2018 दरम्यानच्या उत्पन्नाची उघड चौकशी केली होती. या चौकशीमध्ये त्यांच्या कायदेशीर उत्पन्नांच्या स्त्रोताव्यतिरिक्त 33 लाख 57 हजार 86 रुपये किंमतीची अर्थात उत्पन्नाच्या तुलनेत 43.37 टक्के जास्त अपसंपदा सापडली होती.
दरम्यान या पती-पत्नीला पोलीस कोठडीत पाठविले होते. या दरम्यान कावळे यांच्या संकेतनगर घराची झडती घेतली तेंव्हा तेथे संडास बाथरुममध्ये सुध्दा लपवलेला ऐवज सापडला. या ऐवजाची एकूण किंमत 1 कोटी 17 लाख 29 हजार 600 रुपये आहे. त्यात सोन्याचे दागिणे, चांदीचे दागिणे आहेत. यात 61 लाख 57 हजार 300 रुपये रोख रक्कम पोलीसांनी जप्त केली आणि इतर 52 लाख 86 हजार 700 रुपयांच्या मौल्यवान वस्तु सुर्यकांत कावळे यांचा मुलगा सिध्दांत कावळे (23) आणि त्यांच्या विवाहित कन्या श्वेता सचिन फुलपगार यांच्या ताब्यात परत दिल्या.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत पाठविल्यानंतर सुर्यकांत कावळे आणि सौ.मिना कावळे यांनी जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जाच्या सुनावणीनंतर न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी सुर्यकांत कावळे आणि मिना कावळे यांना जामीन नाकारला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी मांडली. तर कावळे पती -पत्नीच्यावतीने नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.आशिष गोधमगावकर यांनी सादरीकरण केले होते.
कावळे पती-पत्नींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला