मी प्रभु श्री रामचंद्रांची माफी मागतो-नरेंद्र मोदी

नांदेड(प्रतिनिधी)-आज शेकडो वर्षानंतर प्रभु श्री राममुर्तीची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर मी रामाची क्षमा मागतो. आम्हाला हे काम करण्यासाठी उशीर लागला. परंतू आज प्रभु श्री रामचंद्राची प्रतिष्ठापणा म्हणजे नवीन कालचकराचा उद्‌‌‌गम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आज दुपारी 12.29 वाजता प्रभु श्री रामचंद्राच्या बालरुपातील मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष गोपालदास महाराज, कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राम मंदिराच्या मुर्ती भेट दिल्या. सोबतच आज एक डाक तिकीट जारी करण्यात आले. आजच्या विशेष कार्यक्रमात 8 हजार निमंत्रीतांना जागा मिळाली होती. त्याचेही उत्कृष्ट नियोजन अयोध्येत करण्यात आले होते.
आपल्या शब्दात नरेंद्र मोदी यांनी अनेक बलिदान, शेकडो वर्षाची प्रतिक्षा संपवून आज प्रभु श्री राममुर्तीची प्रतिष्ठापणा करून मी तुमच्यासोबत बोलतांना माझा कंठ दाटला आहे. माझे शरीर थरथर कापत आहे आणि आजनंतर राम कापडाच्या टेंटमध्ये राहणार नाहीत आणि ते भव्य मंदिरात राहितील हे सांगतांना मला आनंद होत आहे. आजची मुर्ती प्रतिष्ठापणा म्हणजे नवीन कालचक्राची सुरूवात अशी नोंद आजच्या दिवसाची होईल असे नरेंद्र मोदी म्हणतात. भारत देशातच नव्हे तर जगात आजचा आनंद साजरा होत आहे. आजची वेळ म्हणजे रामकृपेमुळेच या क्षणात आपण जीवन जगतो आहोत. आजच्या दिवसामुळे काल चक्रावर न मिटणाऱ्या रेषा उमटल्या आहेत. मी आज दैवीय अनुभव करत आहे. त्यामुळेच मी प्रमु रामचंद्रांची क्षमा मागतो की, आम्हाला हे काम करण्यासाठी वेळ लागला. काही तरी कमतरता आमच्यातच होती म्हणूनच आम्हाला एवढा वेळ लागला आहे. प्रभु रामचंद्र आम्हाला या चुकीसाठी क्षमा करतील.
संविधानात सुध्दा प्रभु श्री.रामचंद्र विराजमान आहेत असे असतांना सुध्दा आम्हाला एवढे वर्ष वाट पाहावी लागली.11 दिवसांच्या उपसादरम्यान मी पंचवटी, त्रिपायर मंदिर, लेपाक्ष मंदिर, रंगनाथ स्वामी मंदिर, रामेश्र्वरम, धनुष्यकौडी या सर्व ठिकाणी जाऊन, ज्या-ज्या ठिकाणी प्रभु श्री राम गेले होते. तिथपर्यंत मी गेलो होतो, सागर ते सरयु पर्यंतची यात्रा करत मी आज तुमच्या समोर आलो आहे. राम हे देशाला समायोजन करण्याचे सुत्र आहे. प्रत्येकाच्या अंतरमनात प्रभु श्री राम विराजमान आहे. रमते यशवंत इती राम: ज्यात राम रमतो तो राम, ज्यात सर्वजण रमतात तो राम, आमच्या पुर्वजांनी राम जगले आहेत. पिढ्यान पिढ्या अनेक लोकांनी आपल्या शब्दात राम व्यक्त केले आहेत. रामकथा असिम आहे आणि रामायन अनंत आहे. ज्या आमच्या पुर्वजांनी त्याग, बलिदान आणि तपस्या करून आजचा दिवस आणला त्यांचे आम्ही ऋणी आहोत. आजचा दिवस भारतीय समाजाला परिपक्वतेचा बौध देणारा दिवस आहे. आपल्याच ईतिहासातील गाठा उघडतांना अनेकदा समस्या होतात. पण भारतातील लोकांनी राम ईतिहासाच्या गाठा उघडतांना एवढ्या सहजतेने त्या गाठी काढल्या आणि म्हणूनच आज भव्य राम मंदिर उभे राहिले आहे.
राम मंदिर तयार झाले तर आग लागेल असे म्हणाऱ्यांना भारतातील लोकांच्या समन्वयाने गप्प करून टाकले आहे. राम आग नव्हे, राम उर्जा आहे. राम विवाद नाही, समाधान आहे. राम सर्वांचे आहेत आणि राम अनंत काळ आहेत. आजच्या या उत्सवामुळे सर्व व्यापकतेचे दर्शन घडले. राम भारतीय संस्कृतीच्या अतुट विश्वासाची प्राणप्रतिष्ठा आहे. राम भारताची चेतना आहे, राम भारताचे चिंतन आहे. राम भारताची व्यापकता आहे. राम भारताची विश्वासहार्यता आहे. हजारो वर्षापर्यंत आजच्या प्राणप्रतिष्ठेचा प्रभाव राहिल.
आम्ही अयोध्येसाठी जे काही केले त्यानंतर अयोध्या सुध्दा आम्हाला प्रश्न विचारत आहे की, पुढील हजार वर्षापर्यंतच्या भारताची पायाभरणी आज करण्यात आली आहे. राम म्हणजे राष्ट्रनिर्माण आहे. राम येणार आहे याची आठवण करतांना शबरीला विसरून चालणार नाही. सर्मपण आणि सेवाभाव भगवान हनुमंतांकडून घ्यायला हवे तर राष्ट्रनिर्माणमध्ये आपले हात जोडले जातील. मी तर लहान आहे मी काय करू शकतो असा विचार आला तर रामायणातील खारुताईचा विचार करा तिने केलेले काम सुध्दा रामसेतू तयार करण्यामध्ये महत्वपूर्ण आहे. रामपासून राष्ट्रनिर्माण करण्यात आपला प्रत्येक शब्द लावून टाकू. रामाची पुजा करतांना स्वत्वाला सोडून सर्मपण, सेवा असा प्रसाद प्रभुला द्या तर भारताचा विकास करण्यात आमचे योगदान असेल. आज भारतात असलेली उर्जा अर्थात युवक आता चुकणार नाहीत असे त्यांनी ठरवायला हवे, थांबणार नाहीत असे ठरवायला हवे तरच भारताच्या नवप्रभाताचा वेळ लिहिण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. भारताच्या अभ्युदयाचा साक्षी प्रभु श्री राम आहे. सामुहिक शक्तीने सुरू केलेले काम कधीच थांबू शकत नाही. आम्ही आता विकासाकडे जाणारच आहोत असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

जोश में होश की बात करने की जिम्मेदारी मुझेही दी जाती है-डॉ.मोहन भागवत
याप्रसंगी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत म्हणाले, घरात कलह झाल्यामुळे प्रभु श्री रामांना 14 वर्ष वनवासात जावे लागले होते. आजच्या भारतीय परिस्थितीमध्ये कोणताही कलह होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू. आजच्या दिवसानंतर देशाचे दु:ख आणि दैन्य समाप्त होईल त्यासाठी आम्हालाही धर्माचरण करावे लागेल. आपसात समन्वय ठेवावा लागेल. सत्य, सेवा आणि सुचिता तसेच अनुशासन पाळावे लागेल. आपण असे केले तर भारत विश्र्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही. याप्रसंगी जोश में होश की बात करने की जिम्मेदारी मुझेही दी जाती है। असे डॉ.मोहन भागवत म्हणाले.

जेथे मंदिर बनविण्याचा संकल्प घेतला होता तेथेच बनवले मंदिर-योगी आदित्यनाथ
रामाय रामचंद्राय… अशी सुरुवात करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आज आपण त्रेतायुगात आल्यासारखे वाटत आहे. या दिवसाची प्रतिक्षा 5 दशकांपासून आपण केली. अनेक संत, नागा, पुजारी, बुध्दीमान सर्वांनी आप-आपल्या स्तरावर राम मंदिर बनविण्यासाठी संघर्ष केला. आज प्रभु रामचंद्रांची मुर्तीप्रतिष्ठापणा म्हणजे देशाची सामुहिक चेतना जागृत झाली आहे. मी त्या शिल्पकाराचा ऋणी आहे ज्याने प्रभु रामचंद्रांची मुर्ती बनवली आहे. रामचंद्राचे जीवन संयमाचे शिक्षण देते आणि संयमच आपल्या कामाला पुर्णत्वाकडे नेते. राम मंदिर हे राष्ट्र मंदिर आहे आता श्री रामाच्या अयोध्येत गोळ्यांचे आवाज ऐकायला मिळणार नाहीत, संचार बंदी पाहायला मिळणार नाही तर फक्त रामाची गुज तेथे ऐकायला मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण मोदींमध्ये दिसतात-गोविंद देवगिरी महाराज
याप्रसंगी राम मंदिर ट्रस्टचे महंत गोपालदास महाराज म्हणाले की, अनेकांच्या बलिदानाने आजचा दिवस उगवला आहे. ज्याची वाट आम्ही शेकडो वर्षापासून पाहत होतो. याप्रसंगी राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, आज प्रभु श्री रामचंद्रांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा म्हणजे देशाच्या आत्मविश्र्वासाची, विकासाची प्रतिष्ठापणा आहे. अनेक कारण एकत्र येतात तेंव्हा एक महापुरूष येत असतो आणि त्यानंतर जगाची समृध्दी होत असते. आजच्या सनातन युगाची सर्वात मोठी उपलब्धी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्र्वासचे आदर्श आहेत. राममुर्तीची प्रतिष्ठापणा करण्याअगोदर मी काय केले पाहिजे असे विचारले असतांना आम्ही नरेंद्र मोदींना धार्मिक आधारावर कर्म, मन, वाणी शुध्द करण्यासाठी तीन दिवसाचे तप सांगितले होते. कारण तपानेच परि शुध्दी होत असते परंतू नरेंद्र मोदी यांनी 9 दिवस अनशन करून आपण तपस्वी राजकीय नेता असल्याचे दाखवून दिले. देशाला महान बनविण्यासाठी ते देशभर फिरून आपल्या शुध्दीसाठी झटत राहिले. 11 दिवस त्यांनी जमीनीवर विश्राम केला. तपाच्या कमतरतेमुळेच आम्हाला राम मंदिर उभारणीसाठी शेकोडो वर्ष लागले असतील पण आज मोदीजींना श्री रामानेच हिमालयातून परत पाठवून देश सेवा करण्यासाठी पाठविले आहे असा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री.शैलम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती अनेक सरदारांच्या विनंतीमुळे छत्रपतींची इच्छा मागे राहिली असा उल्लेख केला. मला छत्रपती शिवाजी राजांचे गुण पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये दिसतात असा उल्लेख गोविंद देवगिरी महाराजांनी केला. गोविंद देवगिरी महाराज परभणी जिल्ह्यातील ढालेगाव येथील रहिवासी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *