
नांदेड(प्रतिनिधी)-प्रभु श्री रामचंद्र मुर्ती प्रतिष्ठापणा अयोध्येत झाली असतांना भारतभरासह नांदेडमध्ये दिवाळीच साजरी झाली. मेरे प्रभु श्री राम आये है या घोषणांनी आसमंत दुमदुमले. जागो-जागी लोकांनी ढोल ताशे वाजवून आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी प्राण प्रतिष्ठेची व्हिडीओ चित्रकरण मोठ्या स्क्रीनवर दाखवले जात होते.
आज पौष शुध्द द्वादशीच्या मुहूर्तावर दुपारी 12 वाजून 29 मिनिटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक मोहन भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीवेन पटेल यांच्या उपस्थितीत श्री.रामचंद्रांच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा वैदिक मंत्रोचारात पार पडला. सर्वात शेवटी उपस्थितांनी प्रभु श्री रामचंद्रांची आरती करून हा कार्यक्रम पुर्ण झाला. अयोध्येत 8 हजार विशेष निमंत्रीतांना बोलावण्यात आले होते. सर्वसामान्य माणसासाठी प्रभु श्री रामांचे दर्शन उद्यापासून सुरू होणार आहे.


नांदेडमध्ये भरभर भगवे पताके लावण्यात आले होते, जवळपास सर्व मंदिरे सजावट करण्यात आली होती. गल्लो-गल्ली महिलांनी रांगोळ्या काढून प्रभु श्री राम चरणी वंदन केले. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात फटाके वाजवून जनतेने दिवसा दिवाळी साजरी केली. राममय वातावरण सर्वत्र दिसत होते.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सर्व पोलीस उपअधिक्षक, सर्व पोलीस निरिक्षक, अनेक अधिकारी, अनेक पोलीस अंमलदार, केंद्रीय राखीव दलाचे जवान,गृहरक्षक दलाचे जवान,परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नांदेड शहरात सुरू असणारा जल्लोष वृत्तलिहिपर्यंत सुरूच होता.
