नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी महोदय आपण पोलीस पाटील परिक्षेमध्ये घेतलेल्या दक्षतेसाठी आपला पॅटर्न राज्यभरात प्रशंसनिय झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेकडून अकृषीक कर आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, आणि पंचायत समितींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा वेगळा कर आकारला जात आहे. हा अन्याय मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. गावठाणातून अकृषीक कर वसुल करता येत नाही हा महसुल नियम आहे तरी पण आपल्या आदेशाने नांदेड शहर महानगरपालिका जनतेकडून हा अकृषीक नावाचा जाचक कर वसुल करत आहे. काही तरी असे करा की याबाबत सुध्दा आपले नाव राज्यभर घेतले जावे.
नांदेड शहरात गावठाण क्षेत्र कोठे-कोठे आहेत. याची माहिती सर्वसामान्य जनतेला नाही. पण गावठाण कोठे आहे किंवा नाही ही शासकीय जबाबदारी आहे. ज्या ठिकाणची वस्ती जशी-जशी जुनी होत जाते. तशी-तशी ती गावठाणात जाते असाच काहीसा आशय सर्वसामान्य माणसांना माहित आहे. नांदेड शहरातील नावघाट हा परिसर सर्वात जुनी वस्ती आहे. तसेच त्यानंतर हळुहळु आजच्या परिस्थितीत राज कॉर्नर पर्यंतच्या वस्त्या गावठाण झाल्याच असणार. कारण वस्ती वाढल्यानंतर त्याला गावठाणमध्ये परावर्तीत करणे ही महसुल विभागाची जबाबदारी आहे. पण असे काही घडलेले दिसत नाही. गावठाण क्षेत्र घोषित झाल्यानंतर त्यात घरे, व्यवसाय करणे यास मुभा असते. आपल्या पध्दतीने आपण काय बदल केले हा प्रश्न आपल्या कार्यालयाचा आहे. मुळात गावठाण परावर्तीत झाल्यानंतर अकृषीक कर कसा वसुल केला जातो हा यक्ष प्रश्न अनेक वर्षांपासून जनतेसमोर उभा आहे.
जुन्या नांदेड भागात सुध्दा अकृषीक कर वसुल केला जात आहे. कोणाला काही सांगितले तर मनपाचे अधिकारी, कर्मचारी सांगतात हा प्रश्न आमचा नाही. तर तो महसुल विभागाचा आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आम्ही ही अकृषीक कराची वसुली करतो. त्यातील काही टक्केवारी आम्हाला मेहनताना मिळते. पण महसुल विभागाला माहिती असेलच नाही जिल्हाधिकारी साहेब की, नांदेड शहरातील कोणते क्षेत्र गावठाण झाले आहेत आणि कोणते झाले नाहीत. आपल्या कार्यालयाने सरसकट अकृषीक कराची वसुली करून जनतेवर अन्याय सुरू आहे. कधी एखादा अधिकारी असेही म्हणतो की, तहसीलदारांकडे अर्ज द्या आणि त्यांच्याकडून ते माफ करून आणा. म्हणजे जनतेने चुकीच्या वसुलीसाठी सुध्दा अर्ज द्यायचा काय? आजपर्यंत करोडो रुपयांची अशी चुकीची अकृषिक कराची वसुली झालेली आहे.
ज्याप्रमाणे आपले नाव पोलीस पाटील भरती प्रक्रिये बद्दल गाजले गेले आहे. त्याप्रमाणेच या अकृषीक कराबद्दल सुध्दा योग्य निर्णय घेवून योग्य सुचना दिल्यास चुकीचा अकृषीक कर वसुलीचा प्रकार बंद होईल.नांदेडची जनता आजही अकृषीक कर भरत आहे तर मग महानगरपालिकेचा कर जनतेला भरणे बंधनकारक कसा झाला? या दुविधेतून आपण नांदेड शहरातील नागरीकांची मुक्तता करावी एवढ्यासाठीच हा शब्द प्रपंच.
मतदार नोंदणी आणि मतदार जागृतीमध्ये नंबर 1
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वत: दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मतदार नोंदणी आणि मतदार जागृती या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याच्या संपुर्ण टिमने केलेल्या कामाबद्दल निवडणुक आयोगाकडून दि.25 जानेवारी अर्थात राष्ट्रीय मतदार दिवस या दिवशी पुरस्कार मिळणार आहे. अकृषीक करासंदर्भाने सुध्दा आपण लक्ष पुर्वक कार्यवाही केली तर त्यासाठी सुध्दा आपले नाव राज्यभर गाजेल यात काही शंका नाही.