नांदेड(प्रतिनिधी)-पंजाब येथील कुख्यात अतिरेकी अमृतपालसिंघ बाटचा एक साथीदार पंजाब राज्यात खून करून नांदेडला आला होता. त्याला नांदेड पोलीसांनी पकडले आहे. त्याला पंजाब पोलीसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यात राहणारा अमृतपालसिंघ बाट याचे नाव आता दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आले आहे आणि सध्या तो जर्मनी देशात राहतो. त्याचा साथीदार जुगराजसिंघ काबलसिंघ उर्फ युवी (28) याने तरणतारण जिल्ह्यात कट रचून खून केल्याचा गुन्हा क्रमांक 4/2024 दाखल आहे. हा गुन्हा करताच जुगराजसिंघ नांदेडला पळून आला. याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे आणि पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे यांना प्राप्त झाली. त्यांच्यासोबत अनेक पोलीस अंमलदारांनी त्याचा माग काढला. तो पळून रेल्वेमध्ये बसलेला आहे आणि पळून जात आहे याची माहिती प्राप्त केली. तेंव्हा नांदेड पोलीसांनी त्याचा पाठलाग करत अकोला गाठले आणि अकोला रेल्वे पोलीसांच्या मदतीने त्याला पकडले. या बाबतची माहिती पंजाब पोलीसांना देण्यात आली आहे. पंजाब पोलीस आल्यावर जुगराजसिंघ त्यांच्या ताब्यात दिला जाईल अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.जुगराजसिंघला नांदेडमध्ये कोणी मदत केली काय? या संदर्भाने सुध्दा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पंजाब येथील कुख्यात अतिरेकी अमृतपालसिंघचा साथीदार नांदेड पोलीसांनी पकडला; खून करून नांदेडला आला होता