नांदेड(प्रतिनिधी)-मौजे वाघी ता.नांदेड येथील जवळपास 200 शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार घेवून आल्यानंतर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.पण ज्या माणसाविरुध्द गावकऱ्यांनी तक्रार आणली. त्यालाच बोलण्याची सुचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गावकऱ्यांना केली.
मौजे वाघी ता.जि.नांदेड येथील पांडूरंग भुजंगा हनमंते आणि त्यांच्यासोबत जवळपास 200 लोक जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आवक विभागात दिलेल्या निवेदनानुसार गावातील तलाठी धनतोड हे दुसरे तहसीलदार असल्यासारखेच वागतात. गावात हजर राहत नाहीत. प्राण्यांचा दाखला, 7/12 देण्यासाठी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाहीत. त्यांनी आपल्या मदतीसाठी अनिल वैद्य आणि राजू हिंगमिरे नावाचे दोन सहाय्यक ठेवले आहेत. जे तलाठी साहेबांच्या नावाखाली पैसे मागतात. सोबतच आमचे साहेब निर्भिड आहेत कोणाला भित नाही असे सांगतात.तसेच तलाठी धनतोड यांना काही बोललोत तर मला काही शिकवू नका, मला जास्त बोललात तर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करील अशा धमक्या देतात.
सन 2023 मध्ये गारपिट आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी बनवतांना 25 हजारांमागे 5 हजार, 50 हजारांमागे 15 हजार अशी आर्थिक लुट करून प्रत्यक्षात पाहणी न करताच पैसे देणाऱ्यांचीच नावे शासनस्तरावर सादर केली. गारपीट झाली तेंव्हा तलाठ्याच्या घराचे बांधकाम सुरू होते. शेतकऱ्यांनाकडून घेतलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातूनच त्याने घर बांधलेे आहे असा आरोप निवेदनात केला आहे. गरीब शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांची नावे पिडीत ग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत आलीच नाहीत. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तेंव्हा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आम्हाला पुन्हा त्या धनतोड नावाच्या तलाठ्याशीच भेटा आणि बोला असे सांगितले. या निर्भीड आणि भ्रष्टाचारयुक्त तलाठ्याचे निलंबन करून बदली करण्यात यावी. त्याने गावकऱ्यांसोबत केलेल्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वाघी गावकऱ्यांनी या निवेदनात केली आहे.
संबंधीत व्हिडीओ…
मौजे वाघी येथील भ्रष्टाचारी तलाठ्यास निलंबित करा-मागणी