नांदेड(प्रतिनिधी)- यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 75 टक्के मतदान होईल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करतांना बोलावलेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. याप्रसंगी निवडणुक विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगिता चव्हाण, नायब तहसीलदार देविदास पोटे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या निवडणुकीत मतदार नोंदणी आणि मतदार जागृती या दोन विषयांमध्ये नांदेड जिल्ह्याने केलेल्या कामगिरीसाठी निवडणुक आयोग बक्षीस देणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये 75 टक्के मतदान होईल हे सविस्तर सांगतांना मरण पावलेल्या मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत, महिलांची नोंदणी जास्त झाली आहे. नवीन मतदारांची नोंदणी जास्त झाली आहे. तसेच ज्येष्ठ नागरीक आणि अपंग नागरीकांना निवडणुकांमध्ये टपाली मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रांवर सर्व भौतिक सुविधा उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे हा मतदानाचा टक्क वाढेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केली.
नांदेड जिल्ह्यात 39 मतदान केंद्रे संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. संवेदनशिलला विस्त्रोत करून सांगतांना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, या ठिकाणी कोणत्याही गुन्ह्याचा प्रकार घडला असे नाही तर या 39 मतदान केंद्रांवर एकाच उमेदवाराला जास्त मतदान मिळाले आहे. म्हणून त्यांना संवेदनशिल घोषित करण्यात आले आहे.
यंदाच्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 26 लाख 71 हजार 537 आहे. ज्यामध्ये दर हजारी पुरूषांसोबत महिलांची संख्या 934 आहे. 18-19 वर्ष वयाच्या नुकतेच मतदान करण्यासाठी पात्र ठरलेल्या मतदारांची संख्या 32 हजार 360 आहे. ज्यामध्ये 20 हजार 948 या निवडणुकीत वाढले आहेत. नांदेड जिल्ह्यात तृतीयपंथीय यामध्ये 155 मतदान आहेत.
नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदान केेंद्र संख्या पुढील प्रमाणे आहेत. 83 किनवट-330, 84 हदगाव-319, 85 भोकर-343, 86 नांदेड उत्तर-348, 87 नांदेड दक्षीण-312, 88 लोहा-330, 89 नायगाव-349, 90 देगलूर-348, 91 मुखेड-362 अशा एकूण 3041 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामध्ये नवीन मतदान केंद्रे 30 आहेत.
दुर्गम भागात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीमधील संपुर्ण 10 मतदार संघांमध्ये 7078 ऐवढी लोकसंख्या आहे. त्यांची कुटूंब संख्या 1329 आहे. मतदार यादीत नोंदणी केलेल्या व्यक्तींची संख्या 385 आहे. त्यातील 175 लोकांना यंदा मतदान कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. 106 जणंाना शिधा पत्रिका उपलब्ध करून दिली आहे. 223 जणांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले आहे. 117 जणांना अधिवास प्रमाणपत्र दिले आहे. 141 जणांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र दिले आहे. विविध योजनांमध्ये 61 जणांना लाभ देण्यात आला आहे.
लोकसभा-विधानसभा निवडणुकीत 75 टक्के मतदान होईल-अभिजित राऊत