दुसरी एक जबरी चोरी सुध्दा उघड
नांदेड(प्रतिनिधी)-हिंगोली गेट येथील फटाक मैदानावर खून करून मयताचे शिर धडावेगळे करणाऱ्या दोघांपैकी एकाला पकडण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे. तसेच खूनातील पकडलेला गुन्हेगार आणि दुसरा यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली .
दि.5 जानेवारी रोजी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फटाका मैदानावर एक मरण पावलेला व्यक्ती सापडला. त्याचा गळा कापून शिर धडावेगळे करण्यात आलेेले होते. मयत अनोळखी होता पण काही वेळानंतर मरण पावलेला व्यक्ती विकास यशवंतराव राऊत असल्याचे कळले. त्यानंतर विकासच्या मारेकऱ्यांचा शोध हा महत्वपूर्ण होता. त्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे आणि आनंद बिचेवार यांनी भारतसिंग धारासिंग बावरी (35) रा.भावेश्र्वरनगर चौफाळा मरघाट नांदेड ह.मु.इंदिरानगर झोपडपट्टी कळमनुरी यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने मी आणि माझा मित्र जय या दोघांनी मिळून विकास राऊतचा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणात मयत विकास राऊतचा मोबाईल वाळू जि.छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू असल्याचा तांत्रिक पुरावा मिळाल्याने तो मोबाईल राहुल मोटे नावाच्या व्यक्तीकडून जप्त करण्यात आला. मयत विकास राऊत आपल्या मैत्रीणीसह वाळू येथेच राहत होता आणि तेथेच काम करत होता.ती मैत्रीण गर्भवती झाल्यानंतर तो नांदेडला गर्भपाताच्या गोळ्या घेण्यासाठी आला होता. या सर्व पार्श्र्वभूमीवर तपास सुरू आहे. सध्या भारतसिंग धारासिंग बावरीला वजिराबाद पोलीस ठाण्यातील भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 11/2024 मध्ये वजिराबाद पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तपासादरम्यान ही माहिती सुध्दा मिळाली की, 5 जानेवारी रोजीच वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अखिलेशकुमार दुबे नावाच्या व्यक्तीची लुट करण्यात आली होती. त्या संदर्भाने गुन्हा क्रमांक 33/2024 दाखल झाला होता. त्या प्रकरणात भारतसिंग धारासिंग बावरी व इतर एक साथीदार अशा तिघांनी मिळून जसविंदरसिंघ उर्फ जस्सी स्वरुपसिंघ रामगडीया (42) याने केल्याची माहिती प्राप्त झाली. जसविंदरसिंघ उर्फ जस्सीला अटक करण्यात आली असून त्याला पुढील तपासासाठी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या आरोपींकडून 17 हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पांडूरंग माने, संतोष शेकडे, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, दत्तात्रय काळे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार गुुंडेराव कर्ले, सुरेश घुगे, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, किशन मुळे, गजानन बैनवाड, मोतीराम पवार, ज्वालासिंग बावरी, राजू सिटीकर, दिपक ओढणे, मारोती मुंडे हे उपस्थित होते. पोलीस अधिक्षकांनी या सर्वांचे कौतु केले आहे.
शिर धडावेगळे करून खून करणाऱ्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले