घरफोडले, सिलेंडर चोरले, एटीएम फोडण्याचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 17 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 हजार रुपये किंमतीचे ऑक्सीजन सिलेंडर चोरीला गेले आहे. भोकर येथून एटीएममधून नोटा चोरण्याच्या प्रयत्नात एटीएम मशीनचे 70 हजारांचा नुकसान झाले आहे. शिवाजीनगर आणि वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक-एक दुचाकी चोरीला गेली आहे.
राजेंद्र व्यंकटराव देलवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर साई कमानीजवळ श्रध्दा अपार्टमेंट येथे आहे. दि.23 जानेवारीच्या दुपारी 2 ते 3 या वेळेदरम्यान त्यांचे बंद घरफोडून चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे 2 लाख 17 हजार 285 रुपये किंमतीचे चोरून नेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
चंद्रकांत बाबूराव उबाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जानेवारीच्या रात्री 8 वाजेपासून ते 24 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेदरम्यान कामठा खुर्द येथील त्यांचे उबाळे इंजिनिअरींग फोडून चोरट्यांनी छताचा टिनपत्रा वाकवून आत प्रवेश केला. त्यातील एक एलपीजी सिलेंडर व एक ऑक्सीजन सिलेंडर असा 18 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
एसबीआय शाखा भोकरचे व्यवस्थापक अंबुज ओमप्रकाश ओझा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर 1 ते 3 वाजेदरम्यान एसबीआय बॅंक शाखेच्या प्रवेशद्वारासमोरील एटीएम मशीन गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. सुदैवाने रोख रक्कम चोरीला गेली नाही. परंतू एटीएम मशीनचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भोकर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 23 जानेवारी रोजी बालाजी नागोराव पाटील यांची दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.एल.9461 चोरी गेली आहे या दुचाकीची किंमत 30 हजार रुपये आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तहसील कार्यालयाच्या पार्कींग मधून दुपारी जयराम बालाजी आडंबे यांची 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एच.4752 चोरीला गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *