पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून कोंडी; आंदोलनाचा इशारा 

नांदेड,(प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची कोंडी करण्याचे काम पदव्युत्तर विभागाच्या प्रशासनाकडून होत आहे.नियमांना डावलून मनमानी कारभार चालवत काही निवडक घटकालाच सहकार्य करण्याची भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली असून विविध मागण्यांसाठी विद्यापीठ परिसरात लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पीएच. डी. संशोधक विद्यार्थी कृती समितीच्यावतीने प्रा.राजू सोनसळे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात आणि देशात स्पर्धा परीक्षा दरवर्षी होतात. सेट, नेट परीक्षा दरवर्षी घेतली जाते. परंतु पीएच.डी. साठी आवश्यक असणारी पेट परीक्षा मात्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ दरवर्षी घेत नाही. त्यामुळे ही परीक्षा दरवर्षी घेण्यात यावी. तसेच ऑफ लाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात यावी.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या वतीने घेण्यात आलेल्या पेट- 2022 मधील रिक्त असलेल्या जागा भरण्याकरिता विशेष आर.ए.सी. च्या बैठकीचा दिनांक 30 एप्रिल 2023 रोजीच्या परिपत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करावी. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या पीएच.डी. संशोधन फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांना दररोज संशोधन केंद्रावर बायोमेट्रिकनुसार ठसा लावण्याची करण्यात आलेली सक्ती तातडीने मागे घ्यावी. यासह अनेक प्रलंबित प्रश्न असून विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाकडून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी करण्याचे काम होत आहे.

प्रस्तुत विद्यापीठात संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारंवार जाणीवपूर्वक चालढकल होत असलेल्या आर.आर.सी. बैठकीच्या तारखांचा मुहूर्त लावावा, अन्यथा नाईलाजास्तव विद्यापीठ परिसरात लवकरच तीव्र आंदोलन येईल, असा इशारा पीएच.डी. संशोधक विद्यार्थी कृती समितीच्यावतीने प्रा.राजू सोनसळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *