पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाची योजना, गाईच्या दुधाला ५ रुपये प्रति लिटर अनुदान

नांदेड (जिमाका),- विभागातील व जिल्ह्यातील सहकारी दुध संघ, खाजगी प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागामार्फत राबविण्यात येत असल्याची माहिती लातूर विभागाचे पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉ. एन.ए.सोनवणे यांनी दिली आहे. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे ईअर टॅगींग मोहिम राबविण्यात येत आहे. तरी दुध पुरवठा करणाऱ्या पशुपालकांनी आपल्या जनावरांचे टॅगींग करुन घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दुध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील सहकारी दुध उत्पादक संघ, खाजगी प्रकल्प यांना गाईचे दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय दि.५ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे. ही योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

 त्याअनुषंगाने संबंधित संघ व खाजगी प्रकल्प यांनी 3.5 फॅट/8.5 एस.एन.एफ. या गुणप्रतिच्या दुधासाठी प्रति लिटर 27 रुपये दर देणे आवश्यक आहे. किमान 3.2 फॅट/8.5 एस.एन.एफ पर्यंतच्या दुधासाठी ही योजना लागू आहे. त्यापेक्षा कमी अथवा जास्त गुणप्रत असल्यास प्रत्येकी ३० पैसे प्रमाणे वजावट अथवा वाढ करणे आवश्यक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून प्रति लिटर पाच रुपये अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे. थेट बॅंक खात्यात अनुदान जमा होण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बॅंक खाते आधार कार्ड व ईयर टॅग शी जोडलेले असणे आवश्यक असून त्याची भारतीय पशुधन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. विभागातील एकूण 12 सहकारी संघ, एक मल्टीस्टेट संघ, 2 फर्मर प्रोड्युसर कंपनी, 46 खाजगी दुध प्रकल्प अशा एकूण 61 संस्थांना तर नांदेड जिल्ह्यातील 2 खाजगी दुध प्रकल्पांना गाईचे दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल. पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे ईअर टॅगिंग मोहिम राबविण्यात येत आहे. तरी दुध पुरवठा करणाऱ्या पशुपालकांनी आपल्या जनावरांचे टॅगींग करुन घ्यावे,असे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी रि.भा.मते, प्रादेशिक सह आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. एन.ए. सोनवणे, प्रादेशिक सह आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. संजीव गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *