नांदेड(प्रतिनिधी)-सततच्या पाठपुराव्यानंतर 14 महिन्यांनी एका महिलेल्या मृत्यूप्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. मयत महिलेचे पती यांच्या जवळ महिलेच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला यासंदर्भाने जवळपास एक हजार कागदपत्रांची संचिका उपलब्ध आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी हनमंता रामकिशन शेट्टे रा.लोहा यांच्या पत्नी सुमन यांना लोहा येथील डॉक्टर संजय नागनाथराव जवळगेकर आणि डॉ.गणेश रुस्तुम चव्हाण यांच्या दवाखान्यात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्रसुतीनंतर त्यांना रक्तस्त्राव जास्त होत होता आणि तो थांबविण्यात डॉ.जवळगेकर आणि चव्हाण यांना अपयश आले. 24 नोव्हेंबर 2021 रोजी त्या उपचार देणाऱ्या महिलेला नांदेडकडे पाठविले आणि नांदेडला आणल्यानंतर तिचा मृत्यू अगोदरच झाला होता असे हनमंत शेटे यांना सांगण्यात आले.
त्यानंतर हनमंत शेट्टे यांनी आपल्या पत्नीच्या उपचारामध्ये डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला अशी तक्रार केली. अनेक कागदपत्र जमा केले. वैद्यकीय समितीकडे तक्रार दिली. पण कुठे ना कुठे डॉक्टरांना वाचविण्याचा प्रयत्न सुरूच राहिला. पण हनमंत शेट्टे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडला नाही. फक्त वास्तव न्युज लाईव्हने हनमंत शेट्टे यांच्या त्रासाला वाचा फोडली होती. त्यालाही आता जवळपास सहा महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. पुढे चौकशी समितीचा अहवाल नवीन आला आणि त्यानुसार हनमंत शेट्टे यांनी 26 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार माझ्या पत्नीच्या उपचारात हलगर्जीपणा केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. तो मृत्यू लपावा म्हणून वेगवेगळी खोटी कागदपत्रे बनवली आणि प्रशासकीय कार्यालयामध्ये दिली असे तक्रारीत नमुद आहे.
या तक्रारीवरुन लोहा पोलीसांनी डॉ.संजय नागनाथराव जवळगेकर आणि डॉ.गणेश रुस्तुम चव्हाण या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 304(अ), 465, 467, 471 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 24/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास लोहा येथील पोलीस उपनिरिक्षक नाईक यांच्याकडे देण्यात आला आहे.
14 महिन्यानंतर एका महिला रुग्णाच्या मृत्यू जबाबदार दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल