नांदेड(प्रतिनिधी)-बसमधून एका महिलेच्या अंगावरील 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. राजश्री शाहु विद्यालय वसंतनगरच्या रस्त्यावरून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या गंठणाचा अर्धा भाग चोरट्यांनी तोडून नेला आहे.
कुसूम मुंजाजीराव दहिवाल या 74 वर्षीय महिला दि.8 जानेवारी रोजी परभणी बसस्थानकातून नांदेडकडे येणाऱ्या बसमध्ये आसनस्थ झाल्या. दुपारी 12.30 वाजता निघालेली बस नांदेडला दुपारी 2.30 वाजता पोहचली.नांदेड बस स्थानकावर उतरल्यानंतर महिलेच्या लक्षात आले की, त्यांच्यावर अंगावर असलेले सोन्याचे एक मिनी गंठण दोन तोळे वजनाची 80 हजार रुपये किंमतीचे, एक सोन्याचे गंठण अडीच तोळे वजनाचे किंमत 75 हजार, दोन सोन्याच्या पाटल्या साडे पाच तोळ्याच्या किंमत 1 लाख 75 हजार रुपये असे एकूण 10 तोळे सोन्याचे जुने वापरते दागिणे किंमत 3 लाख 30 हजार रुपयांचे कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र केंद्रे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी 30 जानेवारी 2024 रोजी तब्बल 22 दिवसानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.
पायल सुयोग चिदरवाड या आपल्या आईसोबत दि.30 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता राजश्री विद्यालय समोरून आपल्या आईसोबत दुचाकी गाडीवर जात असतांना त्यांच्यासमोरून आलेल्या एका दुचाकीवरील तीन जणांपैकी एकाने त्यांच्या आईच्या गळ्यातील 4.5 तोळे वजनाचे गंठण ओढून घेवून तोडून पळून गेले. सुदैवाने चोरट्याच्या हातात फक्त अर्धे गंठन 20 ग्रॅम वजनाचे किंमत 1 लाख रुपयांचे अशा प्रकारे हा ऐवज चोरीला गेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे अधिक तपासकरीत आहेत.
