नांदेड, (जिमाका)- अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना चालू शैक्षणिक वर्षात सन 2023-24 पासून महाडिबीटी https://Prematric.mahait.org/Login/Login प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुला-मुलींसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकांनी 15 फेब्रुवारीपर्यंत महाडिबीटी प्रणालीमध्ये नोंदणी करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार यांनी केले आहे.
या योजनेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यत शिष्यवृत्ती, इयत्ता नववी व दहावी शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा फी या योजनांचा समावेश आहे.