
नांदेड(प्रतिनिधी)-अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणारे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असे वाक्य लिहिलेले माजी महापौर मोहिनी विजय येवनकर यांच्या नावाचे बॅनर महानगरपालिकेने तात्काळ काढले आहेत. यावेळी मनपाच्या लोकांनी सांगितले की, हा साहेबांचा आदेश आहे.
अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नरेंद्र मोदी, अमित शाह, ओमप्रकाश बिल्डा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अशोक चव्हाण यांचे फोटो छापून सिध्दांत धुत यांनी एक मोठे बॅनर शिवाजीनगर येथे लावले होते. त्यामध्ये अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे त्यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले होते. तसेच दुसरे बॅनर ओम हॉटेलजवळ, अशोक चव्हाण यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत असे शब्द लिहिलेले व फक्त अशोक चव्हाण यांचा फोटो असलेले बॅनर माजी महापौर मोहिनी येवनकर आणि अमित वाघ यांच्या नावाने झळकले ते बॅनर सुध्दा महानगरपालिकेने काढले आहेत.
या संदर्भाने महानगरपालिकेच्या लोकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, बॅनर काढण्याचे आदेश मनपा आयुक्त साहेबांनी दिले आहेत. आम्हाला तर आदेशाप्रमाणेच काम करावे लागते म्हणून आम्ही बॅनर काढले आहेत. आज सत्तेत असणाऱ्या पक्षाचे बॅनर कोणतीही परवानगी न घेता लावण्यात आले होते. बहुदा त्यामुळेच हे बॅनर काढण्यात आले आहेत. अशोक चव्हाण कोठेही जातील तरी त्यांच्या सोबत कोलांट उड्ड्या मारणाऱ्यांची भरपूर संख्या असेल यात काही दुमत नाही. परंतू बॅनर प्रदर्शित करतांना उड्डा मारणाऱ्यांनी त्याची कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक आहे.
भारतीय संविधानाने जाती प्रथा संपविण्यासाठी किंवा आपसात समन्वय राहण्यासाठी बरीच मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. भारतातले राजकारण आजही जाती परंपरेवर आधारीतच चालते. पण कॉंगे्रस पक्षाचे एक स्तंभ असलेले अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाला जयश्री राम म्हणून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे खंदे समर्थक असलेल्या अनेक जातींच्या लोकांना आता अडचणी झाल्या आहेत. काही जातीची मंडळी कोणत्याही परिस्थिती भारतीय जनता पक्षात जाणार नाहीत आणि ते गेले तर समाजात त्यांची किंमत शिल्लकच राहणार नाही. अशा परिस्थितीत त्या लोकांनी काय करावे हा प्रश्न नव्याने नांदेड जिल्ह्यात तयार झाला आहे.