
नांदेड(प्रतिनिधी)-8 फेबु्रवारी रोजी सायंकाळी नांदेड बसस्थानकातून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महिलेच्या पर्समधील 1 लाख 4 हजार रुपये किंमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या गुन्हेगाराला नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पकडून त्याच्याकडून 58 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
8 फेबु्रवारी रोजी 1 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरल्या प्रकरणी दाखल झालेला गुन्हा क्रमांक 65/2024 हा तपासासाठी पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे आणि प्रदीप कांबळे यांच्याकडे होता. या प्रकरणात वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला सुचना दिल्या आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम करा असे सांगितले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे, पोलीस अंमलदार मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, शेख इमरान, मेघराज पुरी, अंकुश पवार यांनी बसस्थानक आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतांना बसमध्ये प्रवेश करण्यासाठी घाईत असणाऱ्या महिलेच्या अत्यंत जवळ उभे राहुन त्यांच्या बॅगची चाचपणी करणारा एक त्यांनी शोधला आणि त्याला ताब्यात घेतले. त्याने स्वत:चे नाव प्रल्हाद खंडुजी पांचाळ (54), व्यवसाय फर्निचर बनवणे रा.इंदिरानगर बारड असे सांगितले. तो जर प्रवासाला जात असेल तर त्याच्याकडे प्रवास उपयोग साहित्य असणे आवश्यक होते. पण ते साहित्य पोलीसांना त्याच्याकडे सापडले नाही. म्हणून पोलीसांनी त्याची कसुन चौकशी केली असता त्याने हे कबुल केले की, 8 फेबु्रवारी रोजी महिलेचे साहित्य मीच चोरले आहे. पोलीसांनी त्याच्याकडून विविध सोन्याचे साहित्य एकूण 58 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. हा गुन्हा 13 फेबु्रवारी रोजी दाखल झाला होता आणि 24 तासातच वजिराबाद गुन्हे शोध पथकाने आरोपी पकडला आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी वजिराबाद पोलीसांचे कौतुक केले आहे.