नांदेड (प्रतिनिधि)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेस आज बुधवार ( दि.२१ ) पासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी कॉपी करणाऱ्या ९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
आज बुधवारी पहिल्याच दिवशी सकाळ सत्रात ( ११ ते २.१० ) दरम्यान झालेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेला जिल्ह्यातील १०१ परीक्षा केंद्रावर एकूण ४२ हजार ८९ पैकी ४१ हजार १८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, तर विविध ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर १ हजार ७१ एवढे विद्यार्थी अनुपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने कॉपी करणाऱ्या कंधार तालुक्यातील शेकापुर येथील महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर ७ तर पोस्ट बेसिक आश्रम शाळा गांधीनगर या केंद्रावर १ आणि हिमायतनगर तालुक्यातील जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय येथे १ अशा ९ जणांविरुद्ध कारवाई केली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्राकडून देण्यात आली आहे.