नांदेड(प्रतिनिधी)-पश्चिम बंगालच्या माजी खासदार वृंदा कामत वाई बाजार येेथे आल्या असतांना त्यांच्या कार्यक्रमात कोणी विघ्न आणू नये यासाठी उपस्थित असलेल्या सिंदखेड पोलीसांनी एका बेवारस खुर्चीवर बेवारस बटवा शोधून तो त्या बटव्याच्या मालकीनीकडे दिला. त्यात 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज होता.
आज दि.22 फेबु्रवारी रोजी मौजे वाईबाजार ता.माहूर येथे पश्चिम बंगालच्या माजी खासदार वृंदा कामत यांचा जाहीर सत्कार होता. या कार्यक्रमात कोणी व्यत्य आणू नये म्हणून सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे, पोलीस अंमलदार पवार आणि गृहरक्षक दलाचे जवान मॅकलवार, जुनगरे, जाधव, सुर्यवंशी, दासरवाड, गुंजकर हे तेथे हजर होते. दरम्यान तेथे एका खुर्चीवर एक बेवारस पिशवी(बटवा) सापडला. होमगार्डने ती पिशवी असल्याची माहिती पवार यांना दिली. पवार यांनी पिशवी तपासली तेंव्हा 5 हजार 400 रुपये रोख रक्कम, 2 तोळे सोन्याचे वेड किंमत 1 लाख 19 हजार 600 रुपये असा ऐवज होता.
एक वृध्द महिला डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी तिच्या मुलीला सोबत घेवून यवतमाळ येथे जाण्यासाठी वाईबाजारपासून माहुर पर्यंत बसमध्ये बसून निघून गेली होती. माहूर येथे पोहचल्यावर त्या आई आणि मुलीला हे लक्षात आले की, त्यांचा ऐवज गायब झाला आहे. दोन्ही माय लेकी रडत असतांनाच त्यांना ही माहिती देण्यात आली की तुमचा ऐवज सापडला आहे आणि तो सिंदखेड पोलीसांकडे आहे. आई आणि मुलगी परत वाईबाजार येथे आल्या.सुशांत किनगे, सहकारी पोलीस अंमलदार, होमगार्ड व वाई बाजार येथील नागरीक यांच्या उपस्थितीत हा बटवा त्यांना परत करण्यात आला. आता पुन्हा या दोन्ही मायलेकीच्या डोळ्यात आनंदअश्रु वाहत होते. माहुरमध्ये निघालेले आश्रु वेगळे होते आणि वाईबाजार येथे निघालेल्या आश्रुंची किंमत वेगळी आहे. हे पोलीसांसाठी आदर व्यक्त करत होते.
सिंदखेड पोलीसांनी बेवारस सापडलेल्या बटव्यातील ऐवज अत्यंत त्वरीतगतीने मालकाकडे पोहचविण्याची कारवाई करून समाजाप्रती पोलीसांचे काय कर्तव्य आहे याचे उत्कृष्ट उदाहरण तयार केले. या माणुसकीच्या कामासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे आदींनी सिंदखेड पोलीसांचे कौतुक केले.