नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या कारणामुळे शासकीय संपत्तीचे झालेले नुकसान वसुल करण्याची प्रक्रिया पोलीस विभागाने सुरू केली आहे. वेगवेगळ्या दोन कारणासाठी एकूण 1 कोटी 75 लाख 71 हजार 8 रुपये एवढी रक्कम वसुलीसाठी नांदेड महानगरपालिकेला आदेश देण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी प्रेसनोट माध्यमातून प्रसिध्दीसाठी पाठविली आहे.
29 मार्च 2021 रोजी गुरूद्वारा क्षेत्राबाहेर कोविड नियमावली लागू असतांना काढलेली मिरवणूक आणि त्यानंतर पोलीसांवर झालेला हल्ला शासकीय संपत्तीचे नुकसान याबाबत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात 107 जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे गुरूद्वारा बोर्ड आणि 107 आरोपी यांच्याकडून नुकसान भरपाई वसुल करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार 70 लाख 35 हजार 277 रुपये नुकसान भरपाई आणि महानगरपालिकेकडून वसुलीसाठी लागेल ती फिस असे 2 लाख 11 हजार 58 रुपये अशी एकूण 72 लाख 46 हजार 335 रुपये रक्कम वसुल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेनंतर रजा ऍकॅडमीने केलेल्या आंदोलनादरम्यान झालेली दगडफेक, पोलीस आणि खाजगी वाहनांचे नुकसान, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या संदर्भाने इतवारा, नांदेड ग्रामीण, वजिराबाद, शिवाजीनगर आणि विमानतळ या पोलीस ठाण्यांमध्ये 6 गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत सुध्दा जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावासंदर्भाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार 99 लाख 27 हजार 664 रुपये नुकसान भरपाई आणि 3 टक्के मनपाची वसुली फिस रक्कम 2 लाख 97 हजार 829 रुपये अशी एकूण 1 कोटी 2 लाख 25 हजार 373 रुपये रक्कम वसुल करण्यासाठी महानगरपालिका नांदेड यांना आदेश करण्यात आला आहे. हा आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 51 व 54 अंतर्गत आणि प्रचलित शासन आदेशानुसार करण्यात आल्याची माहिती प्रमोद शेवाळे यांनी दिली आहे.
दंगलीत झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम 1 कोटी 75 लाख 71 हजार 8 रुपये मनपा वसुल करणार-प्रमोद शेवाळे