बेघर पत्रकारांच्या सोसायटी नावात अनेक बदल हा सुध्दा फसवणूकीचा प्रकार
नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांसाठी नांदेडच्या सर्वसामान्य माणसाच्या मालकीची जागा नगरपालिकेने दिलेल्यानंतर बेघर पत्रकारांनी त्याचा धंदा केला. एका अत्यंत गरीब पत्रकाराने आपला भुखंड आ.माधवराव पाटील जवळगावकर (पवार) यांच्या पत्नी सौ.अनिता माधवराव पवार यांना विकला. बेघर पत्रकारांची सत्यता समोर आल्यानंतर मात्र महानगरपालिकेने कांही कागदी घोडे नाचवले खरे पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. अखेर महानगरपालिका प्रशासनाने आपले हात झटकून विमानतळ प्राधीकरणाच्या नावावर सौ.अनिता पवार यांना नकाशाविरुध्द केलेले अनाधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस जारी केली. सौ.अनिता पवार यांनी हे प्रकरण आता न्यायालयात नेले आहे. याचा अर्थ पुढे काही होणार नाही.
बेघर पत्रकारांसाठी महानगरपालिकेने नांदेडच्या सर्वसामान्य नागरीकाच्या मालकीची दोन एकर जागा बहुउद्देशीय पत्रकार सेवा सहकारी गृह निर्माण संस्था नांदेड यांना दिली. यानंतर बेघर पत्रकारांनी या संघटनेचे नावच बदलले आणि पत्र व्यवहार पत्रकार सहवास को.ऑप.हाऊसिंग सोसायटी नांदेड या नावाने सुरू केला. याच नावाने यांच्या संस्थेचे लेखापरिक्षणपण झाले. मग संस्थेचे नाव काय आहे हा प्रश्न तसाच उपस्थित राहिला. बेघर पत्रकारांनी भुखंडांचा धंदा सुरू केल्यानंतर अनेक वेगवेगळे प्रकार घडले. कागदोपत्री आपण किती खरे आहोत हे दाखाविण्याचा बेघर पत्रकारांचा प्रयत्न सुरूच होता. नांदेडच्या एका स्विकृत नगरसेवकाने तक्रार दिली. पण नंतर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणे बंद केले असो. प्रत्येकाची आपली आपली वृत्ती आहे.
महानगरपालिकेविरुध्द तयार झालेल्या या चुकीच्या कामातील वातावरणाचा परिणाम असा झाला की, माधवराव पवार (जवळगावकर) हे कॉंग्रेसचे हदगाव येथील आमदार आहेत. अशा परिस्थितीत नांदेड महानगरपालिकेत कॉंग्रेसची एक हाती सत्ता असतांना त्यांच्या विरुध्द निर्णय घेणे अधिकाऱ्यांच्या अवाक्या बाहेरचे होते. म्हणून विमानतळ प्राधिकरणाने दि.16 नोव्हेंबर 2021 रोजी दिलेल्या पत्राच्या आधारावर तसेच 30 मार्च 2022 रोजी संचालक विमानतळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील आढाव्याच्या आधारे दि.18 मे 2022 रोजी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 2 अशोकनगरचे सहाय्यक आयुक्त यांनी सौ.अनिता माधवराव पवार यांना नोटीस जारी केली. या नोटीसमध्ये बेघर पत्रकारांच्या संस्थेचे नाव बहुउद्देशिय पत्रकार सेवा सहकारी गृह निर्माण संस्था नांदेड यामधील मालमत्ता क्रमांक 1-16-33/25 वर सुरू असलेले नकाशाविरुध्दचे अनाधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत सांगितले आहे. 10 दिवसांच्या आत हे अवैध बांधकाम पाडून घ्यायचे होते. त्यानंतर जर मनपाला बांधकाम पाडायची वेळ आली तर त्याचा खर्च आपल्याकडून वसुल करण्यात येईल असेही लिहिले आहे. या नोटीसच्या आधारावर सौ.अनिता पवार यांच्यावतीने नांदेडच्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात आर.सी.एस.क्रमांक 257/2022 असा दावा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या दाव्यात असे नमुद आहे की, बांधकाम परवानगी महानगरपालिकेने दिली. आमच्या इमारतीपेक्षा 9 फुट उंच पाण्याची टाकी याच भागात आहे मग विमान उड्डाणासाठी त्याचा कांही अवरोध होत नाही तर त्यापेक्षा कमी उंची असलेल्या आमच्या इमारतीने विमान उड्डाणाला कांही एक समस्या येणार नाही. पत्रकार सहवास को.ऑप हाऊसिंगच्या नावाचे अनेक कागदपत्र या संचिकेत आहेत. पण महानगरपालिकेने दिलेल्या नोटीसमध्ये बहुउद्देशिय पत्रकार सेवा सहकारी गृहनिर्माण संस्था असे नाव आहे. म्हणजे बेघर पत्रकारांनी नावामध्ये सुध्दा घोटाळे केले आहेत. असेच हे चित्र आहे.अनिता पवार यांना नांदेड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वात गरीब पत्रकार संजीव तुकाराम कुलकर्णी याने हा भुखंड विक्री केलेला आहे. या बेघर पत्रकारांच्या सोसायटीचे आखीव पत्रक सुध्दा या संचिकेत जोडले आहे. सोबतच सौ.अनिता पवार यांना पत्रकार म्हणून या सोसायटीचे सदस्य करण्यात आलेले आहे आणि नंतर पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे संजीव तुकाराम कुलकर्णीने हा भुखंड सौ.अनिता पवार यांना विक्री केेलेला आहे. सोसायटीच्या जागेची खरेदी खत होत नाही म्हणून त्या जागी कनव्हेन्स डिड असे शिर्षक लिहुन फक्त 12 लाख रुपयांमध्ये हा भुखंड विक्री केल्याचे कागदोपत्री दाखवले आहे.
आखीव पत्रीकेमध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील ठराव क्रमांक 59 दि.5 सप्टेंबर 1990 आधारे 20 फेबु्रवारी 2002रोजी याची नोंद घेण्यात आलेली आहे. त्यातही बहुभाषिक पत्रकार सहवास सहकारी गृहनिर्माण संस्था असा नाम उल्लेख आहे. यावरून कागदपत्रांच्या आधारे बनावट गिरी, बोगस गिरी केलेली आहे हे स्पष्टच दिसते आहे. या मालमत्ता पत्रकार प्रत्येक फेरफार हा खरेदी आधारेच केलेला आहे. म्हणजे ज्या बेघर पत्रकारांनी आपल्याला राहण्यासाठी निवारा नाही असे म्हणून दोन एकर जागा लाटली त्यांनी या भुखंड प्रकरणात मोठा धंदा केला.
संजीव कुलकर्णीने विकलेल्या भुखंडावर सुरू असलेल्या इमारत बांधकामाला पाडण्याची नोटीस