
नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी 12.15 वाजता गहाळ झालेली 40 हजार रुपये रोख आणि सेवानिवृत्तीची कागदपत्र असलेली बॅग इतवारा पोलीसांनी अर्ध्या तासा तच शोधून मालकाला परत दिली. ही बॅग ऍटोत विसरली होती. पोलीस आणि बॅग मालक यांनी ऍटो चालकाचा सन्मान केला.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज दि.26 मे रोजी दुपारी 12.15 या वेळेत मोहम्मद कलीमोद्दीन मोहम्मद शमशोद्दीन यांनी पोलीस मुख्यालय येथून एका ऍटोत प्रवास केला आणि ते इतवारा हद्दीतील किल्ला रोड भागात उतरले. त्यांच्यासोबत एक बॅग होती. ज्यामध्ये त्यात त्यांच्या सेवानिवृत्तीची सर्व कागदपत्रे आणि 40 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज होता. याबाबत मोहम्मद कलीमोद्दीन यांनी इतवारा पेालीस ठाण्यात त्याची माहिती देताच पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी या प्रकरणाचा शोध लावण्याची जबाबदारी पोलीस अंमलदार शिवसांब मठपती यांना दिली.
मठपती यांनी ज्या ठिकाणी मोहम्मद कलीमोद्दीन ऍटोमधून उतरले त्या भागातील कांही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावरून मोहम्मद कलीमोद्दीन ज्या ऍटोमध्ये प्रवास करून आले होते. त्याचा क्रमांक एम.एच.26 एन.1936 असा होता. त्यानंतर मठपती यांनी इतवारा वाहतुक शाखेतील पोलीस अंमलदार दातापल्ले यांच्याकडे ई चालान मशीनद्वारे ऍटो मालकाचे नाव शोधले. त्यांचे नाव सिताराम धोंडीबा जिंकवाड रा.पांडूरंगनगर असे होते. याही पेक्षा मोठा घटनाक्रम असा झाला की, ऍटो चालक सिताराम जिंकवाड स्वत: आपल्या ऍटोमध्ये विसरलेली बॅग घेवून पोलीस ठाणे इतवारा येथे हजर झाले. मोहम्मद कलीमोद्दीन यांनी ऍटोमध्ये विसलेली बॅग स्वत: ऍटो चालकाने इतवारा पोलीस ठाण्यात आणून दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक रुपाली कांबळे, पोलीस अंमलदार शिवसांब मठपती आणि बॅग मालक मोहम्मद कलीमोद्दीन मोहम्मद शमशोद्दीन या सर्वांनी ऍटो चालकाचा सन्मान केला. आपली बॅग परत मिळविण्यासाठी पोलीसांनी घेतलेली मेहनत आणि ऍटो चालकाने आपल्या कामात दाखवलेली कामाबद्दलची त्यांची इमानदारी सर्वांनाच भावणारी होती.
