
नांदेड(प्रतिनिधी)-सावरमाळ शिवारात 15 मे रोजी एका अज्ञात महिलेचे प्रेत सापडले होते. या अज्ञात महिलेचा खून अनैतिक संबंध आणि पैशांच्या देवाण-घेवाणीतून झाला होता. खून करणाऱ्या दोघांना मुखेड न्यायालयाने 31 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
15 मे रोजी सकाळी 8.30 वाजता सावरमाळ शिवारातील खाजा मियॉ महेबुबसाब पिंजारी यांच्या शेतातील आखाड्यावर एका अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. त्यावेळी मुखेड पोलीसांनी आकस्मात मृत्यू क्रमांक 8/2022 दाखल केला. या आकस्मात मृत्यूचा तपास मुक्रामाबाद पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव हे करीत होते. आकस्मात मृत्यूच्या तपासात ही महिला प्रेमला उर्फ इंदर बापूराव भेंडेगाव (30) असल्याचे कळले. तिच्या नातलगांनी सापडलेले कपडे, चपल, मोबाईल चार्जर व इतर दागिण्यांवरून तिची ओळख पटवलेली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश गायकवाड यांनी या महिलेचा मृत्यू डोक्यावरील जखमेमुळे झाला असा अहवाल दिला होता. त्यानंतर प्रेमलाची बहिण चंदरबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा क्रमांक 120/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार दाखल झाला.
एका 30 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून झाला होता. हा प्रकार भयंकरच आहे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गजानन कागणे, गोपीनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार पठाण, सुरनर, मरगेवाड, तग्याळकर, महिला पोलीस पांचाळ, गायकवाड आणि पठाण यांच्या मेहनतीने त्याचे फळ दहा दिवसात आले आणि मुक्रामाबाद पोलीसांनी शंकर यशवंत खपाटे (36) आणि श्रीराम उध्दव पिटलेवाड (31) दोघे रा.बेटमोगरा ता.मुखेड यांना ताब्यात घेतले आणि त्यांना 24 मे रोजी अटक केली. या मारेकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मयत महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध मान्य केले आणि पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून तिचा खून केल्याच ेमान्य केले. पोलीस उपनिरिक्षक गजानन कागणे यांनी या दोन मारेकऱ्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने महिलेच्या मारेकऱ्यांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.