
नांदेड,(प्रतिनिधी)- आई नसलेली तीन बालके घर सोडून निघून गेली होती. पण भोकर पोलिसांनी सध्या सुरु असलेल्या ऑपरेशन मुस्कान – अंतर्गत त्या तीन बालकांना शोधून काढले आणि त्याच्या आजोबांच्या स्वाधीन केले आहे.
पोलिसांनी जून महिन्यात ऑपरेशन मुस्कान – अंतर्गत घरातून गायब असलेल्या बालकांना शोधण्याची एक मोहीम हाती घेतली आहे.भोकर तालुक्यातील धावरी (खु) या गावातील करण (8),आदर्श (9) आणि प्रभू गणेश धावरे (10) हे तिन्ही भाऊ आपल्या आजोबांकडे राहात होते.त्यांची आई त्यांना सोडून गेली होती. बालकांचे आजोबा भोकर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी आपल्या घरातील तीन नातू निघून गेल्याची माहिती भोकर पोलीसांना दिली. भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील यांनी त्वरीत पोलीस अंमलदार देवकांबळे आणि जाधव यांना या बालकांचा शोध घेण्यासाठी पाठवले तेंव्हा ही तीन भाऊ एकत्रीतच नांदेड शहरात सापडली. देवकांबळे आणि जाधव यांनी बालकांना सुखरुप भोकर येथे नेले आणि पोलीस निरिक्षक आणि विकास पाटील यांनी या बालकांच्या आजोबांना बोलावून ते तीन बालके त्यांच्या स्वाधीन केली.
ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत पोलीस विभाग या महिन्या विशेष काम करणार आहे. पोलीसांसोबत सर्वसामान्य नागरीकांनी सुध्दा मुस्कान-11 या मोहिमेत आपला सहभाग दाखविण्याची गरज आहे. आपण फिरतांना, बाहेरगावी जातांना, रेल्वेत प्रवास करतांना, बसमध्ये प्रवास करतांना, प्रवासात कोठे-चहा-पाण्यासाठी थांबलो तेंव्हा आपली नजर इकडे तिकडे फिरवली पाहिजे. ऐवढ्यात सुध्दा सर्वसामान्य नागरीक अनेक बालकांना शोधून शकतील आणि त्यांना पुन्हा आपले घर प्राप्त होईल. चव्हाण कुटूंबातील ही तीन भाऊमंडळी नांदेडलाच सापडली पण यापेक्षा पुढे गेली असती तर मग त्यांचे काय झाले असते या संदर्भाचा विचार केला तर अंगावर काटे येण्याची वेळ आहे. या समाजाच्याबद्दल अनेक गप्पा मारल्या जातात पण काम करत असतांना आम्ही मी आणि माझे कुटूंब अशी सुरूवात करतो त्यामुळेच अशा घटना आमच्या नजरेआड राहतात.