आमचे परिसर सुरक्षीत करा घोषणा देत डॉक्टर विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी केला रस्ता रोको

शासकीय रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात डॉक्टरची दहा हजारांची लुट
नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याला शस्त्रांचा धाक दाखवून त्याच्याकडून 10 हजार रुपये लुटल्यानंतर वस्तीगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी रस्ता रोको करून आमचा परिसर सुरक्षीत राहावा अशा घोषणा दिल्या.
आज दुपारी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील वस्तीगृहाच्या विद्यार्थ्याला चाकुचा धाक दाखवून त्याच्याकडील दहा हजार रुपये लुटल्याचा प्रकार घडला. घटना घडताच वस्तीगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थींनीनी वस्तीगृहासमोरचा रस्ता दगडांनी अडवून बंद केला आणि आमचा वस्तीगृह परिसर सुरक्षीत राहावा अशा जोरदार घोषणा दिल्या. याप्रसंगी एका विद्यार्थ्याने सांगितले की, वस्तीगृहाच्या समोरूनच गावाचा रस्ता आहे. त्यामुळे कोणीही व्यक्ती येथे थांबला तर त्याला विचारणा करता येत नाही आणि वस्तीगृहात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडवून त्यांची लुट केली जाते. मागील एका महिन्या आजची दहा हजाराची लुट हा तिसरा प्रकार असल्याचे तो विद्यार्थी सांगत होता.
याप्रसंगी विद्यार्थींनीपैकी एका विद्यार्थीनीने सांगितले की, आम्हाला रात्री-बेरात्री कोणत्याही वेळेत या रस्त्यातून दवाखान्याला जावे लागते. परत यावे लागते. हे जाणे-येणे आमच्या व्यक्तीगत कामांसाठी नसते तर रुग्ण सेवा करण्यासाठी असते. विद्यार्थ्यांना लुटीचे प्रकार घडले आहेत. तर विद्यार्थींनीच्या सुरक्षेबाबत काय? असा प्रश्न उपस्थित केला.
डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा तसा खुप मोठा आहे. वेगवेगळ्या इमारती दुर-दुरवर पसरलेल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेवून पुढे पांगरा गावाला जाण्याचा रस्ता आहे. असाच काहीसा भाग स्वारातीम विद्यापीठातून सुध्दा आहे. पण विद्यापीठाच्या मुख्यद्वारावर सुरक्षा रक्षक असतात. त्यामुळे तो परिसर सुरक्षीत वाटतो. शासकीय रुग्णालयातून मात्र कोणासही जाण्या-येण्याची बंदी नसते आणि असे लुटीचे प्रकार घडतात. शासकीय रुग्णालय नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *