नांदेड(प्रतिनिधी)-एक आठवडा पुर्ण होण्याअगोदर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 हजारांची लाच स्विकारणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाला गजाआड केले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका वाळू माफियाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यज्ञा वाळूचा व्यवसाय योग्यरितीने चालू राहावा याकरीता स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास शिवलिंगअप्पा वडजे हे दहा हजार रुपयांचे लाच मागत आहेत. याबाबतची शहा-निशाह करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अशोक हिप्पर आणि इतर सहकारी पोलीस अंमलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सापळा रचला. सुर्यास्ताच्यावेळेत सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास भानुदास वडजे यांनी 10 हजारांची लाच स्विकारली आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात बाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.
भानुदास वडजे हे नदीपाहणी दौऱ्याचे एक उत्कृष्ट निरिक्षक आहेत. नदी पाहणी दौरा कसा केला जातो, त्यात काय पाहायचे असते, त्यातील कशावर आक्षेप घ्यायचा असतो आणि तो आक्षेप कायदेशीरपणे कसा सोडवायचा असतो. यात ते पदवीधर आहेत. आज सोमवार हा त्यांच्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस आहे. तरीपण ते शासकीय काम करत होते आणि शासकीय काम करतांना घेतलेल्या दहा लाचेचा परतावा त्यांना करावा लागला.
स्थानिक गुन्हा शाखेचा एएसआय अडकला दहा हजारांच्या लाच जाळ्यात