स्थानिक गुन्हा शाखेच्या एएसआयला तीन दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली सापळा कार्यवाही वादात आल्यानंतर सुध्दा त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.आज दि.14 जून रोजी विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी एएसआयला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल दि.13 जून रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास भारत दुर संचार निगम कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास शिवलिंगअप्पा वडजे (53) यास दहा हजारांची लाच घेतांना पकडले. सार्वजनिक ठिकाणी घडलेला हा प्रकार अत्यंत खास ठरला. जनतेतील असंख्य लोकांनी या प्रकरणाचे फोटो काढले, व्हिडीओ चित्रीकरण केले आणि ते चित्रीकरण आणि फोटो विविध माध्यमातून व्हायरल सुध्दा केले.
या व्हिडीओ चित्रीकरणात भानुदास वडजेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तीन लोकांनी पकडल्यानंतर तुम्ही माझ्या खिशात काही ठेवू नका असे वडजे ओरडत होता. पण इतर एसबीचे लोक त्याची समजूत काढत होते आणि शरिराच्या सर्व बाजूने एसीबी लोकांच्या ताब्यात असलेल्या भानुदास वडजेला जास्त हालचाल करता येत नव्हती असे त्या व्हिडीओमध्ये दिसते. आता तुम्ही माझ्या खिशात पैसे ठेवणार असे वडजे ओरडत होता. त्यावेळी एसीबीच्या लोकांनी व्हिडीओ चित्रीकरण आणि फोटो काढणाऱ्यांना दम देवून तेथून जाण्यास सांगितले. याचेही चित्रीकरण झालेले आहे. एसीबीचा एक माणुस आपल्या उजव्या हाताने आपल्या पॅन्टच्या डाव्या खिशातून काही तरी काढतो आणि आणि तो ती वस्तू वडजेच्या पॅन्टच्या मागील बाजूला उजवीकडच्या खिशात ठेवत असल्याचे स्पष्टपणे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. त्यावेळी सुध्दा वडजे ओरडच होता असे काही करून नका, मला फसवू नका तरी पण त्याच्याशी गोड-गोड बोलून अखेर त्याला पोलीस गाडीत बसविण्यात आले.
याबाबतची तक्रार 14 जून रोजी मध्यरात्रीनंतर 2.40 वाजता दाखल झाली. त्याचा क्रमांक 208 असा आहे. या तक्रारीतील फिर्यादी राहुल दत्ता कांबळे जिगळेकर आपल्या फिर्यादीत लिहितात माझे टिपर चालविण्यासाठी माझ्याकडे भानुदास वडजेने 12 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ती रक्कम 10 हजार ठरली.ती रक्कम मी वडजेच्या गाडीत ठेवली. पंचांच्यावतीने रक्कम ताब्यात घेतली हे सुध्दा फिर्यादीनेच लिहिले आहे. गाडीमध्ये आणि अंगझडतीमध्ये एकूण 1 लाख 29 हजार 300 रुपये पंचासमक्ष मिळाले असे ही या तक्रारीत फिर्यादीने लिहिले आहे. या तक्रारीत शेवटी भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रतिनियम 1988अन्वये भानुदास वडजेवर कार्यवाही करावी अशी विनंती राहुल दत्ता कांबळे जिगळेकर यांनी केली आहे.
आज दि.14 जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर यांनी भानुदास वडजेला पोलीस कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयात हजर केले. त्यात फिर्यादीमधील बरीच हकीकत लिहिण्यात आली आहे. सोबत लाचेची रक्कम 10 हजार रुपये कारमधून जप्त केली आणि इतर 1 लाख 29 हजार 300 रुपये सुध्दा जप्त केल्याचे लिहिले आहे. या प्रकरणात एकच आरोपी असतांना दोन आरोपींना 14 जून 2022 रोजी 2.52 वाजता अटक केल्याचे लिहिले आहे.
सहा वेगवेगळ्या मुद्यांवर तीन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. त्यात 1 लाख 29 हजार 300 रुपये रोख रक्कम कोठून आणली याचा शोध घेणे आहे. लाचेची दहा हजार रुपये रक्कम कोणासाठी स्विकारली याबाबत विचारपुस करणे आहे, वडजेच्या मोबाईल फोनची तपासणी करणे आहे, वाहनांचे नंबर सापडले आहेत त्याबद्दल शोध घेणे आहे. अधिकची विचारपुस करणे आहे. तसेच सगळ्यात शेवटचा सहा क्रमांकांचा मुद्या दोन ओळींमध्ये असलेल्या समासात लिहिला आहे. त्यात पिस्टल काढतांना व्हिडीओ हे तीन वाचण्यासारखे आहेत चौथा वाचता येत नाही. पिस्टल काढतांना व्हिडीओ कोणी काढला याचा कांही उल्लेख नाही. तीन पानांच्या पिसीआर यादीमध्ये चार शब्दांचे एक वाक्य लिहुन पुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या स्वत:वरच प्रश्न चिन्ह उभा केला आहे. या पिसीआर यादीवर पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर यांची स्वाक्षरी आहे.
सरकारी पक्षाच्यावतीने ऍड. राजूरकर यांनी न्यायालयासमक्ष पोलीस कोठडी मिळण्यासाठी युक्तीवाद केला. भानुदास वडजेच्यावतीने अत्यंत विद्वान वकील ऍड. इद्रीस कादरी यांनी युक्तीवाद केला होता. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी भानुदास वडजेला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी..
https://vastavnewslive.com/2022/06/13/स्थानिक-गुन्हा-शाखेच्या-4/