नांदेड(प्रतिनिधी)-अनेकांना त्यांच्या चुकांसाठी तुरुंगात पाठवलेल्या उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना सुध्दा आज तुरूंगात जावे लागले. नायगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अश्विनी पाटील यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. कांही लोक सांगतात तुरूंगाकडे रवाना होण्याअगोदर संतोष वेणीकर सांगत होते म्हणे की, आता मी गप्प बसणार नाही. अनेकांना माझ्यासोबत तुरूंगात बोलवून घेईल. पण ते अनेक जण कोण? याचा कांही उलगडा संतोष वेणीकरने केलेला नाही.
सन 2018 मध्ये कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीमध्ये शासकीय धान्याचा मोठा घोटाळा झाला. हा घोटाळा राज्यभर गाजला. पण 2020 मध्ये तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी नांदेड, तहसीलदार अर्धापूर, परभणी जिल्ह्यातील अनेक महसुली पदावर काम केलेले उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांचेही नाव आले. आपले नाव येताच उपजिल्हाधिकारी परागंधा झाले. सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपल्याला अटक होवू नये यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही आणि अखेर तीन वर्षानंतर संतोष वेणीकर यांनी दि. 16 जून 2022 रोजी नायगाव न्यायालयात आत्मसमर्पण केले. नायगाव न्यायालयाने त्यांना एका दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगातच पाठविले. 17 जून रोजी घरातून अंघोळ केल्यानंतर टिप-टॉप कपडे घालून जसे आपण बाहेर निघतो त्याच पध्दतीने टिप-टॉप परिस्थितीत, आपल्या बुटांना चमचमीत पॉलीश केलेल्या संतोष वेणीकरला पोलीसांनी न्यायालयात हजर केले. त्या दिवशी कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणाचा तपास करणारी शासकीय यंत्रणा गुन्हे अन्वेशन विभागाचे पेालीस उपअधिक्षक दिलीप तळपे यांनी न्यायालयात हजर राहुन पोलीस कोठडी मागितली. नायगाव न्यायालयाने ती आज 20 जून पर्यंत मंजुर केली होती.
आज 20 जून रोजी पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मिळावी म्हणून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. न्या.अश्र्विनी पाटील यांनी तपासातील प्रगती अवलोकीक करून पोलीस कोठडी वाढवून दिली नाही. त्यानंतर संतोष वेणीकरला जामीन द्यावा असा अर्ज आला. त्या अर्जावर मोठा युक्तीवाद झाला. या प्रकरणातील पुर्वीचे अटक अनेक आरोपी 100 दिवसापेक्षा जास्त कालखंडापर्यंत तुरूंगात होते. या सर्व बाबींचा एकंदरीत विचार करून न्यायाधीश अश्र्विन पाटील यांनी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यास जामीन नाकारला आणि त्यांची रवानगी तुरूंगात केली.
आपल्या तुरूंगात जाण्याची वेळ आल्यानंतर संतोष वेणीकर हे असे सांगत होते म्हणे की, आता मी तुरूंगात चाललो आहे पण मी गप्प बसणार नाही मी अनेकांसाठी तुरूंगाचे दार उघडे करणार आहे. पण ते अनेक कोण याबाबत मात्र संतोष वेणीकरने कांही सांगितले अशी माहिती प्राप्त झाली नाही.