नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागाने नांदेड येथील गुरूद्वारा सचखंड बोर्ड बरखास्त केला आहे. या काळात माजी पोलीस महासंचालक, सेवानिवृत्त भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी डॉ.पी.एस.पसरीचा यांच्याकडे कारभार देण्यात आला आहे. डॉ.पसरीचा हे आता गुरूद्वारा बोर्डाचे प्रशासक असतील.
गुरूद्वारा बोर्डात अध्यक्ष भुपिंदरसिंघ मन्हास यांच्याविरुध्द अनेक तक्रारी होत्या. गुरूद्वारा बोर्डाचे काही सदस्य सुध्दा त्याबद्दल बोलत होते. दरम्यानच्या काळात गुरूद्वारा बोर्डाचा विहित कालावधी सुध्दा संपला होता. नवीन निवडणुका व्हाव्यात या बाबत सुध्दा बरेच निवेदन शासनापर्यंत पोहचले होते. दि.30 मे 2022 रोजी गुरूद्वारा बोर्ड अध्यक्षांना महसुल व वनविभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. गुरूद्वारा बोर्डाने दि.2 जून 2022 रोजी आपले लेखी म्हणणे शासनाकडे सादर केले होते. यावर सुध्दा शासनाने गुरूद्वारा बोर्डाने दिलेल्या खुलासा संदर्भाने सखोल चौकशी करून त्याबद्दल स्वतंत्र आणि स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी नांदेड यांना दिल्या होत्या. त्यानुसार 24 जून 2022 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाला पाठवला होता.
शासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारी आणि जिल्हाधिकारी नांदेड यांचा अहवाल यानुसार द नांदेड सिख गुरूद्वारा सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब अधिनियम 1956 च्या कलम 53 (1) नुसार सध्या अस्तित्वात असलेले गुरूद्वारा बोर्ड निष्प्रभावीत करण्याचा निर्णय घेतला. याच अधिनियमातील कलम 53(2)(ब) मधील तरतुदीनुसार गुरूद्वारा बोर्ड अध्यक्ष आणि मंडळाने वापरण्याचे सर्व अधिकार किंवा पार पाडावयाची सर्व कर्तव्य ही निष्प्रभावाच्या कालावधीत सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी तथा महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक डॉ.पी.एस.पसरीचा यांना देण्यात आलीआहेत. या आदेशावर महसुल व वन विभागाचे सहसचिव श्रीराम यादव यांची स्वाक्षरी आहे. या आदेशात असेही लिहिले आहे की, बोर्डाचा निष्प्रभावी कालावधी सहा महिने असले किंवा गुरूद्वारा बोर्डाच्या नवीन निवडणुका होईपर्यंत या पैकी जे अगोदर येईल तो पर्यंत हे अधिकार पसरीचा यांना बहाल करण्यात आले आहेत.