पोलीस अधिक्षक काय करणार हे जनतेने 20 दिवसांपुर्वीच ओळखले होते
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या जनतेला आणि पोलीस विभागातील अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना आता पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे हे काय करणार ते आता अगोदरच कळायला लागले आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तव्य कठोर, तोंडी आदेशावर कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब पुन्हा येणार हे जनतेचे भाकित आज खरे ठरले.
दि.6 जून 2022 रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शिवाजी पाटील यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 14 हजारांची लाच घेतांना अटक केली आणि सोबत त्यावेळेस त्यांच्याकडे असलेलेली 2 लाख 25 हजार रुपये रक्कम सुध्दा जप्त केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीत असतांना श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब शिवाजी पाटील यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याची नोंद त्या दिवशीच्या सेंट्री हवालदाराने घेतली होती. त्यामुळे त्याची बदली सुध्दा करण्यात आली आहे.
यानंतर त्यानंतर त्यांना जिल्ह्याची जबाबदारी देत पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी नियंत्रण कक्षात बोलावले. त्यातही बदल केला आणि त्यांना सुट्टीवर असलेल्या राखीव पोलीस निरिक्षकाच्या जागी काम करण्यास सांगितले. काही दिवसांनी राखीव पोलीस निरिक्षक सुट्टीवरुन परत आले. पण घोरबांड साहेब परत जिल्ह्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी नियंत्रण कक्षात आलेच नाहीत अशी माहिती आहे. त्यांच्या जागी दिपक बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानंतर जनतेतील असंख्य लोकांनामध्ये पैज लागली होती की, अशोकरावजी घोरबांड साहेब पुन्हा येणार..पुन्हा येणार…पोलीस अंमलदार सुध्दा असेच कांही सांगत होते. पण जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी येणे अवघड असते असेही काही जण म्हणत होते. कारण मागे ईस्लापूर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत किनगे यांचा पोलीस अंमलदार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने पकडल्यानंतर त्यांच्यावर अगोदर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. सध्या मात्र ते भाग्यनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब सुध्दा परत येतील याबद्दल कांहींना शंका तर कांहींना आत्मविश्र्वास होता.
आज कर्तव्यदक्ष, गुन्हेगारांचे कर्दनकाळ, गोळीबार करण्यात पटाईत पण मागील दीड वर्षापासून तोंडी आदेशाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब हे आज नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आले आणि आपल्या खुर्चीवर बसून त्यांनी तो फोटो सुध्दा व्हायरल केला. याचा अर्थ पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे पुढे काय करणार आहेत हे जनतेने 20 दिवसांअगोदरच ओळखले होते. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पोलीस अंमलदारांबद्दल काही लिहिण्याची ताकत आमचीपण नाही. जनतेला असाच भारी अधिकारी हवा आहे हे मात्र नक्की.