नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत नांदेड जिल्हा पोलीस आणि लोहमार्ग पोलीस यांच्या मेहनतीनंतर एक 13 वर्षाचा बालक त्याच्या वडीलांच्या ताब्यात देण्यात आला. हा बालक रेल्वे स्थानकावर पोलीसांना भेटला होता.
ऑपरेशन मुस्कान-11 या मोहिमेवर काम करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, मारोती माने, शितल सोळंके, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय जोशी, राजकुमार कोटगिरे हे पथक बेवारस आणि संशयास्पद बालकांचा शोध घेत असतांना रेल्वे स्थानकावर पोहचले. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे आणि त्यांचे अंमलदार योगेश गिरी हे फलाट क्रमांक 1 वर फिरत असतांना त्यांना एक 13 वर्षाचा बालक भेटला. त्याच्याकडे माहिती घेतली असता त्याने सांगितले की, माझ्या वडीलांनी मला नांदेड येथील एका हॉस्टेलमध्ये शिक्षण घेण्यासाठी ठेवले होते. परंतू मला तेथे राहण्याची इच्छा नव्हती. म्हणून मी तेथून बाथरुमला जात आहे असे सांगून गुपचूप निघून आलो आहे. पोलीस पथकाने त्याच्या वडीलांचा फोन नंबर घेवून त्यांच्यासोबत संपर्क साधला आणि विचारणा केली असता त्याच्या वडीलांनी सांगितले की, हॉस्टेलच्या गुरुजींनी मुलगा निघून गेल्याची माहिती दिली आहे. यानंतर त्यांना बोलवण्यात आले आणि आपल्या मुलाला सुखरूपपणे आपल्या स्वाधीन केल्याबद्दल पोलीस विभागाचे मनस्वी धन्यवाद व्यक्त केले. ऑपरेशन मुस्कान राबवणाऱ्या या पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पेालीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.
ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत पोलीसांनी एका अल्पवयीन बालकाला शोधले