नांदेडमध्ये सुध्दा पंढरपुर धर्तीवर एकादशीला निघणार दिंडी

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आषाढी एकादशी पंढपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्य आणि देशभरातून असंख्य भाविक पायी पंढरपूर येथे पोहचतात. ज्या लोकांना पंढरपूरला जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी विठ्ठलाची दिंडी पाहण्याची आणि त्यातील आनंद नांदेडलाच मिळण्यासाठी डॉ.रमेश नारलावार यांनी 10 जुलै रोजी माऊली दिंडीचे आयोजन केले आहे.
आज बोलवलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.रमेश नारलावार, डॉ.शंकर सिंगेवाड, मोहन पाटील, गणेश ठाकूर यांच्या उपस्थितीत ही माहिती पत्रकारांना देण्यात आली. भारतीय संस्कृतीमध्ये माणुसकीची अंतिम पायरी आहे आणि ही पायरी वारकरी संप्रदायाच्या माध्यमाने पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये आणि त्यांची सेवा करणाऱ्यांमध्ये दिसते. जे लोक पंढपूरला जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी पंढरपूर यात्रेचे दर्शन व आनंद देण्याच्या उद्देशाने माऊली दिंडीच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न होणार आहे. दि.10 जुलै रोजी या दिंडीची शोभायात्रा दुपारी 3 वाजता विठ्ठल-रुखमाई मंदीर, संत नामदेव मंदिर (गायत्री मंदिराजवळ) येथून निघेल. ही दिंडी जुना मोंेढा, हनुमान टेकडी, महावीर चौक, मारवाडी धर्मशाळा, कलामंदिर अशी जात सोमेश कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिर येथे पुर्ण होणार आहे. या यात्रेत सामील होवून नागरीकांनी या आनंद यात्रेला मोठे स्वरुप द्यावे असे आवाहन डॉ.रमेश नारलावार, गणेश ठाकूर, मोहन पाटील, राहुल दाचावार, डॉ.तळणकर, पंढरी महाराज मुरकुटे, मुन्ना उर्फ नारायणदास बजाज यांनी केले आहे. या शोभायात्रेत पांढरा शर्ट-पॅन्ट किंवा धोतर शर्ट आणि टोपी असा पेहराव करून सर्वांनी सहभागी व्हावे अशी अपेक्षा संयोजकांनी केली आहे. या यात्रेत प्लॉस्टीक न वापरण्याबद्दल सामाजिक संदेश दिला जाणार आहे. पंढरीच्या दिंडीत गोल रिंगण पाहण्यासाठी भाविकांना जशी ओढ असते असेच गोलरिंगण या आनंद यात्रेत सुध्दा केले जाणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली. स्वामी समर्थ मंदिरात सायंकाळी 6 वाजता या दिंडीची समाप्ती महाप्रसादाने होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *