नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभर आषाढी महोत्सव साजरा होत असतांना अवैध दारु विक्री करणाऱ्या एकाला पकडून स्थानिक गुन्हा शाखेने 38 हजार 100 रुपये किंमतीची देशी व विदेशी दारु पकडली आहे.
आज आषाढी महोत्सव आणि ईद उल अजहा हे दोन सण एकत्र असल्याने प्रशासनाने भरपूर बारकाईने सर्वत्र लक्ष ठेवले होते. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस अंमलदार बजरंग बोडके, मोतीराम पवार, देविदास चव्हाण, तानाजी येळगे, हेमंत बिचकेवार हे पथक गस्त करत असतांना अण्णाभाऊ साठे चौकात साहेबराव गंगाराम बसवंते या व्यक्तीकडे तपासणी केली असता त्याच्या ताब्यात भिंगरी नावाच्या देशी दारुचे काही बॉक्स आणि मॅग्डॉल नंबर वन नावाच्या विदेशी दारुचे बॉक्स सापडले. या सर्वांची किंमत 38 हजार 100 रुपये आहे.पकडलेला साहेबराव गंगाराम बसवंते आणि जप्त केलेली दारु पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आली आहे.