“मला न समजलेली पंढरीची वारी”

मुंबई – पंढरपूर वारीची सांगता झाली. माझे आजोबा सच्चे वारकरी होते. वयाच्या आठव्या/ नवव्या वर्षी कधी चालत कधी वडीलांच्या खांद्यावर बसून मी पंढरीची वारी केली होती.

आमच्या वस्ती वरील भजणी मंडळाचा पेटीवादक, गायक म्हणून महत्वाचा सभासद होतो मी.पुढे गाथा/ वारीचा निंदक बनलो.

निवृत्ती नंतर पुन्हा एक दोन दिवसासाठी दरवर्षी वारीत सामील होऊ लागलो.कारणही तसेच घडले.नोकरीत असताना एक शोध प्रकल्प हाती घेतला होता. आम्ही पोलिसच नव्हे तर सर्व सरकारी नोकर मिळणाऱ्या पगाराच्या मोबदल्यात जनतेला सेवा का देत नाही.एकूण समाजात उदासीनता व हतबलता का? इतर अनेक कारणाबरोबर बहुजन समाजाची कार्य प्रेरणा(motivation) फार निकृष्ठ दर्जाची आहे असे मत बनले.पूर्वीही तशीच होती.प्रेरणा प्रभावी बनविण्याचे अनेक जागतिक सिद्धांत अभ्यासले.तरी पण शेवटी संतांच्या गाथा मध्ये इथल्या समाजाच्या प्रेरणा प्रभावी करण्याची बीजे आढळली.ती निवडून त्यावर आधुनिक जागतिक विचारांचे कलम करणे, खतपाणी घालणे हा एकमेव पर्याय आढळला.

ब्राह्मणी शोषण,वर्चस्व, कायम राखण्यासाठी रचलेली कर्मकांडे या वारकरी चळवळीने झुगारून दिली व नामस्मरण हा पर्याय दिला व राबविला!

भागवत धर्माचा कळस रचण्याचे काम तुकोबारायांनी करून चारशे वर्षापुर्वी निर्धार केला होता की

“अवघाची संसार सुखाचा करीन ।”

….हा अभंग मी भजनात गायलाय. ऐकलाय.

मग आम्ही वारकर्यांनी तिन्ही लोक जाऊद्या पण स्वतःला अगर आपल्या समाजाला किती सुखी केले?नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार 155 देशात हॅपिनेस इंडेक्स मध्ये आपला 145 वा क्रमांक आहे.केनिया, झिम्बाबवे यांच्या बरोबरीचे!

400 वर्षात आम्ही मागास व दुखीच का राहिलो?

अलीकडे संतांची गाथा समजून घ्यायला सुरुवात केली .लक्षात आले की आजच्या सर्व प्रश्नांना संतांनी उत्तरे दिली आहेत तीही शेकडो वर्षांपूर्वी! मग त्यांचा विचार आचरणात किती आणला आम्ही?

मानवी जीवन फार गुंतागुंतीचे आहे त्याचा उलगडा करता न आल्याने ते दुखमय व अर्थहीन(meaningless) बनलेले आहे.लोक तीन प्रकारे जीवनाचा सामना करतात असे ‘अलबर्ट कामू’ म्हणतो.

1)आत्महत्या करणे- शरीर नष्ट करणे .

2)श्रद्धा(faith) ठेवणे,ही बौद्धिक-मानसिक-तात्विक आत्महत्याच होय.हे दोन्ही मार्ग पलायनवादी ठरतात.

3)वास्तव मान्य(acceptance)करून जगणं अर्थपूर्ण करण्यासाठी बंडखोर (rebel) बनणे

वारीच्या वर्तन व्यवहारात माझ्या सारख्याला श्रद्धेचा पगडा जाणवतो.श्रद्धाळू विचार, चीकित्सा, विश्लेषण, करायचे सोडून देतो.सर्वभार श्रद्धेवर ठेवून तणावमुक्त बनतो पण वास्तवातील गुंतागुंत आणखी दुःख निर्माण करते.

“बुडती हे जण न पाहावे डोळा।

म्हणून कळवळा येतसे । ।”

अशी मांडणी करून संतांनी सनातनी ब्राह्मणी शोषणा विरुद्ध बंड पुकारले

“वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा ।

येरांनी वाहावा भार माथा ।।”

अशी गर्जना करून आम्ही श्रेष्ठ आहोत. तुम्ही तर वेद पाठीवर वाहणारे प्राणी आहात असे मंबाजी भट व मंडळींना सुनावले.

आजही बहुसंख्य स्त्रिया स्वतःला खानदानी समजत कर्मकांडात बुडालेल्या दिसतात.संत जनाबाईची हेटाळणी करण्यात आली होती.तीने 700 वर्षांपूर्वी उत्तर देऊन स्त्री मुक्तीचा एल्गार पुकारला होता.

“डोईचा पदर आला खांद्यावरी।

भरल्या बाजारी जाईन मी ।।”

ब्राम्हणी कर्म कांड व शोषणातून बाहेर काढण्यासाठी राम कृष्ण हरी, विठ्ठल पांडुरंग,ज्ञानोबा तुकाराम हा नामस्मरणाचा साधा सोपा पर्याय रुजवीला पण तो एकमेव व अंतिम नव्हता.नाही. सनातनी ब्राम्हणी धर्माला उघड आव्हान देऊन अर्थ पूर्ण जगण्याचे मार्ग संतांनी दाखवले या परंपरेतून.

” जोडूनिया धन उत्तम व्यवहारे ।

उदास विचार वेच करी ।।”

असा चांगले जगण्याचा मार्ग दाखवून

“अवघाची संसार सुखाचा करिन ।

आनंद भरीन तिन्ही लोकी ।।”

असा निर्धार केलेला आहे. हा निर्धार,ती बंडखोरी या वारीत दिसते का? ही उर्मी कुंणी थांबवली ते शोधुया.त्यामागे मंबाजी व रामेश्वर शास्त्रीची पिलावळ आहेच पण संतांच्या रक्ताशी व विचाराशी नाते सांगणारे बामणी काव्यात अडकलेले कोण व किती हेही शोधावे लागेल.

नामस्मरणाच्या श्रद्धेचा आदर करत वारी चालत राहिलीच पाहिजे.पण या गुंतागुंतीच्या अर्थ हीन वाटणाऱ्या जीवनाला भिऊन पलायनवादी बनायची गरज नाही.चिकित्सक वास्तववादी,…,बनत या गुंतागुंतीच्या जगण्याविरुद्ध बंड करून जगणं अर्थपूर्ण बनविले पाहिजे,बनवितां येते हे मला वारी व गाथा मधून अलीकडे समजले! हे बंड समांतर चळवळीतून पुढे नेण्याची सुरवात आम्ही केलेली आहे त्यावर सविस्तर बोलू.

– सुरेश खोपडे

सेवा निवृत्त आयपीएस अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *