नांदेड(प्रतिनिधी)-मार्केट यार्ड नवीन मोंढा येथून सोयाबीन भरलेले 60 किलो वजनाचे सहा पोते चोरल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी अत्यंत जलद कार्यवाही करत दोघांना अटक केली आहे.
मगनपुरा भागात राहणारे बालाजी दत्तराम कोसडे यांची मार्केट यार्डमध्ये संकल्प ट्रेडींग कंपनी नावाची दुकान आहे. दि.14 जुलै रोजी रात्री त्यांच्या दुकानासमोर टीनशेडमध्ये ठेवलेले 60 किलो वजनाचे सोयाबीन भरलेले सहा पोते, 21 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. आपल्या तक्रारीतच बालाजी कोसडे यांनी दिपक उर्फ दिनेश गंगाधर मैराळे (35) रा.वाई ह.मु.दत्तनगर नांदेड याच्यासह दोन लोक असल्याचे लिहिले होते. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 267/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 379 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शेख इब्राहिम यांच्याकडे देण्यात आला.
शिवाजीनगर पोलीसांनी अत्यंत जलद कार्यवाही करत या प्रकरणातील तक्रारीत आरोपी या सदरात नाव लिहिलेला व्यक्ती दिनेश उर्फ दिपक गंगाधर मैराळे(26) रा.वाई ह.मु.दत्तनगर नांदेड तसेच धरमचंद हरी पवार (38) रा.खंडोबा बाजार परभणी ह.मु.दत्तनगर नांदेड या दोघांना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार या आरोपींनी या पुर्वी सुध्दा नवा मोंढा मार्केट यार्डमधून सोयाबीन, हळदीचे पोते असे अनेकदा चोरलेले आहे. संकल्प ट्रेडींग समोरून चोरलेला सोयाबीनचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतलेला आहे.
मार्केट यार्डमधून सोयाबीन चोरणारे दोन चोरटे शिवाजीनगर पोलीसांनी विद्युतगतीने गजाआड केली