कौटुंबिक न्यायालयाच्या पायर्‍यांवर आपल्या भावजीचा खून करणार्‍या मेव्हण्याला जन्मठेप

नांदेड (प्रतिनिधी)- कौटुंबिक न्यायालयाच्या पायर्‍यांवर आपल्या भावजीवर तलवारीने हल्ला करून त्याचा खून केल्याप्रकरणी नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी एका युवकाला जन्मठेप आणि 10 हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयामध्ये हरबन्ससिंघ दिलीपसिंघ शिलेदार (34) रा. अजबनगर, औरंगाबाद यांचा आणि त्यांच्या पत्नीसोबत वाद सुरू होता. कौटुंबिक न्यायालयात जो कौटुंबिक वाद सुरू होता, त्यासंदर्भाने दि. 26 सप्टेंबर 2017 रोजी काही लाखांचे धनादेश हरबन्ससिंघच्या पत्नीला द्यायचे होते. त्यादिवशी न्यायालयात हरबन्ससिंघचा मेव्हना विक्रमजितसिंघ उर्फ विक्की बलजितसिंघ लिखारी, त्यांची बहिण परमिंदरकौर, आई प्रकाशकौर आणि वडिल बलजितसिंघ हजर होते. दुपारी न्यायालयाच्या जेवणाची सुट्टी झाल्यानंतर हरबन्ससिंघ शिलेदार हे काही कागदपत्रांची झेरॉक्स आणण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या पायर्‍यावरून खाली येत असताना विक्रजितसिंघ उर्फ विक्की बलजितसिंघ लिखारी (30) याने आपले भावजी हरबन्ससिंघ दिलीपसिंघ शिलेदार यांच्यांवर तलवारीने पायर्‍यावरच हल्ला केला. या हल्ल्यात हरबन्ससिंघच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या. त्यादिवशी त्याच्यासोबत औरंगाबादहून आलेले त्यांचे बंधू प्रितपालसिंघ दिलीपसिंघ शिलेदार यांनी जखमी भाऊ हरबन्ससिंघला ऑटोमध्ये टाकून रूग्णालयात उपचारासाठी नेले. पण दुर्देवाने या हल्ल्यात हरबन्ससिंघ शिलेदार यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी प्रितपालसिंघ शिलेदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 सप्टेंबर 2017 रोजी गुन्हा क्र. 55/2017 हा खुनाच्या सदरात वजीराबाद पोलीसांनी दाखल केला. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी या प्रकरणाचा तपास करताना अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि त्या तपासाच्या आधारावर विक्रमजितसिंघ उर्फ विक्की बलजितसिंघ लिखारी, त्याचे वडील बलजितसिंघ, आई प्रकाशकौर, बहीण परमिंदर कौर यांना आरोपी केले. न्यायलयात हा प्रकार सत्र खटला या सदरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांच्या न्यायालयात चालला. या प्रकरणात न्यायालयात एकूण 15 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदविले. जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. आशिष गोदमगावकर यांनी विविध मुद्यांच्या अनुसार सादरीकरण केले. आरोपींच्यावतीने अ‍ॅड. मिलिंद एकताटे आणि अ‍ॅड. एस.एन. हाके यांनी बचावाची बाजू सांभाळली. एकूण एकत्रीत उपलब्ध पुरावा ज्यामध्ये तोंडी जबाब, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी आपले भावजी हरबन्ससिंघ शिलेदारचा खून करणारा मेव्हणा विक्रमजितसिंघ उर्फ विक्की बलजितसिंघ लिखारी यास दोषी जाहीर केले. इतरांची सुटका केली. विक्रमजितसिंघ लिखारीला खुन केल्याप्रकरणी जन्मठेप आणि 10 हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दंड भरला नाही तर एक वर्षे अतिरिक्त शिक्षा विक्रमजितसिंघला भोगायची आहे. या खटल्यात वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार जितेंद्र तरटे आणि बालाजी लामतूरे यांनी पैरवी अधिकार्‍यांची भुमिका पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *