स्थानिक गुन्हा शाखेने गुटखा पकडला; आरोपीला सात दिवस पोलीस कोठडी

पीसीआयची पदोन्नती प्राप्त केल्यानंतर पहिल्याच गुन्ह्यात गोविंद मुंडे यांचे यश

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने १ लाख २ हजारांचा गुटखा पकडल्यानंतर पकडलेल्या एका आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनी ईंबिसात देशमुख यांनी ७ दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पोलीस उपनिरिक्षक डॉ.परमेश्वर ठाणुसिंग चव्हाण यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक गोविंद मुंडे, जसवंतसिंघ शाहु, अत्यंत मेहनती पोलीस अंमलदार संजय केंद्रे, रुपेश दासरवाड, पदमसिंग कांबळे, हेमंत बिचकेवार यांना गस्तीवर पाठवले. हे गस्तीपथक नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असतांना त्यांना मिळालेल्या अत्यंत गुप्त माहितीनुसार वाजेगाव ते धनेगाव चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर स्वराज मार्केट यार्डमध्ये ट्रक क्रमांक एम.पी.०९ एच.जी.०३८५ या ट्रकमध्ये इंदौर येथून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा आणला आहे. पोलीस पथकाने तेथे जावून त्या ठिकाणी ट्रक मधून उतरत असलेल्या प्रतिबंधीत गुटख्याबद्दल चौकशी सुरू केली. कांही गुटखा दुकानात ठेवण्यात आला होता. काही गुटखा ट्रकमध्येच होता. पोलीस पथकाला तेथे सापडलेल्या व्यक्तीने आपले नाव मोहम्मद मोसीन मोहम्मद अब्दुल फहीम (३०) असे सांगितले. पोलीस पथक आपली तपासणी करत असतांना संधीचा फायदा घेवून ट्रक चालकाने तो ०३८५ क्रमांकाचा ट्रक ज्यामध्ये गुटखा होता तो पळवला. पोलीस पथकाने ट्रकचा पाठलाग केला. परंतू ट्रक अत्यंत भरधाव वेगात रस्त्यावरील लोकांना जीवाचा धोका होईल अशा परिस्थितीत पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर पोलीसांनी गुटख्याची बारकाईने तपासणी केली. तेंव्हा त्या संपुर्ण गुटख्याची किंमत १ लाख २ हजार ६८ रुपये भरली.

या गुन्ह्याची तक्रार पोलीस उपनिरिक्षक डॉ.परमेश्वर ठाणुसिंग चव्हाण यांनी दिली. यामध्ये आरोपी रकान्यात मोहम्मद मोसीन मोहम्मद अब्दुल फहीम(३०), मोहम्मद अब्दुल मुजीब मोहम्मद अब्दुल सलीम, ट्रक क्रमांक एम.पी.०९ एच.जी.०३८५ चा चालक आणि मालक, सय्यद अली यांची नावे आरोपी रक्कान्यात लिहिली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या सर्व लोकांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम ३२८, २७२, २७३, १८८, सोबत अन्न सुरक्षा कायदा २००६ चे नियम व नियमन २०११ च्या कलम २६(२), २७, २३ सह ३०(२)(ए) तसेच ५९ (९) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक झाल्यानंतर पहिल्यांदा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक गोविंद मुंडे यांना देण्यात आला.

पोलीस उपनिरिक्षक गोविंद मुंडे यांनी आरोपी यादीमधील मोहम्मद मोसीन मोहम्मद अब्दुल फहीम (३०) रा.छोटी दर्गाहजवळ नांदेड यास २१ जुलै रोजी अटक केली. आज दि.२२ जुलै रोजी पोलीस उपनिरिक्षक गोविंद मुंडे, उत्कृष्ट पोलीस अंमलदार संजय केंद्रे, शंकर मैसनवाड यांनी मोहम्मद मोसीनला न्यायालयात हजर केले. न्यायालयात सादरीकरण करतांना गोविंद मुंडे यांनी सांगितले की, या प्रकरणातील इतर आरोपींचा पत्ता अटक केलेल्या मोहम्मद मोसीनलाच माहित आहे. तसेच या प्रकरणातील पळून गेलेला ट्रक पकडायचा आहे. त्या ट्रकवर असलेला क्रमांक मध्यप्रदेश राज्यातील आहे. तसेच त्याचा मालक शोधायचा आहे,असे सांगून मोहम्मद मोसीनला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश देशमुख यांनी मोहम्मद मोसीनला सात दिवस, अर्थात २९ जुलै २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *