अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्याकडील जामीन अर्ज न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांच्या न्यायालयात वर्ग

जामीन अर्जांवरी निर्गती आता लवकर होणार 

नांदेड(प्रतिनिधी)-तुरूंगात असलेल्या एका आरोपीने मागीतलेला जामीन जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 एस.इ.बांगार यांनी उशीर लावत असल्यामुळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे तक्रार केली. त्या एका तक्रारीमुळे जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 कडे प्रलंबित असलेले सर्व जामीन अर्ज आता जिल्हा न्यायाधीश क्रमांक 2 सी.व्ही. मराठे यांच्याकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी आज दिला आहे.

दि.2 जून 2022 रोजी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 एस.ई.बांगर यांच्याकडे अर्ज क्रमांक 509/2022 दाखल करण्यात आला. या प्रकरणात कपील मगरे व इतर असे आरोपी आहेत. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश-1 एस.ई.बांगर यांनी 13 जून 2022 रोजी पोलीसांनी दाखल केलेला जबाब संचितकेत जोडला. त्यानंतर सुनावणीसाठी वेळ नाही म्हणून हे प्रकरण 16 जून रोजी ठेवण्यात आले. त्यानंतर युक्तीवाद ऐकून प्रकरण आदेशाकरीता राखीव ठेेवण्यात आले. त्या तारखा वाढतच गेल्या असे हे प्रकरण 25 जुलै 2022 पर्यंत पुढेच ढकलले गेले. त्यामुळे न्यायालयाच्या वेळेअभावी आरोपी तुरूंगात राहिला आणि न्यायापासून वंचित राहिला. याप्रकरणातील एक मुख्य आरोपी सदाशिव उर्फ कपील अंभुरे यांना अर्ज क्रमांक 184 द्वारे 9 मार्च 2021 रोजी जामीनीवर सोडले होते. पण दुसरा आरोपी लक्ष्मण उर्फ बाळू कोंडबा मगरे यास अर्ज क्रमांक 538 नुसार 21 जून 2022 रोजी जामीनीवर सोडले. या सर्व जामीनवर सोडलेल्या आदेशांसह 25 जुलै रोजी एक अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे सादर करण्यात आला. त्यात अर्जदारांचे विवाह झालेले आहेत. त्यांना कुटूंब आहे. अर्जदारांच्या उत्पन्नावर कुटूंब चालते आणि प्रकरण एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून आदेशासाठी प्रलंबित ठेवले आहे. तेंव्हा हे प्रकरण इतर न्यायालयाकडे वर्ग करून जामीन अर्जावरील निकाल लवकरात लवकर द्यावा अशी विनंती केली होती. या अर्जावर अर्जदार कपील दामोधर मगरे व इतर असे लिहिले आहे. त्यावर त्यांचे वकील ऍड. संतोष इंगळे यांनी स्वाक्षरी केलेली आहे. हा अर्ज जिल्हा न्यायालयाच्या आवक विभागात 25 जुलै 2022 रोजी दाखल झाला होता.

या अर्जावर एक कार्यालयीन आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी 27 जुलै रोजी जारी केला आणि या आदेशाची अंमलबजावणी लवकर व्हावी असे नमुद केले. या आदेशात अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा जिल्हा न्यायाधीश-1 एस.ई.बांगर यांच्याकडे प्रलंबित असलेले सर्व जामीन अर्ज काढून घेण्यात आले आहेत. ते सर्व अर्ज जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यांनी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी कायद्यानुसारच्या सर्व प्रलंबित अर्जांची निर्गती करावी. या पुढे फौजदारी प्रक्रिया संहिता 439 प्रमाणे एस.ई.बांगर यांच्या न्यायालयात येतील ते सर्व अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा जिल्हा सत्र न्यायाधीश-2 सी.व्ही.मराठे यांच्याकडे देण्यास सांगितले आहेत. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 438 प्रमाणे जिल्हा न्यायालयात येणारे अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्याकडे सुनावणी आणि निर्गतीसाठी पाठवले जातील. अशा प्रकरणांमध्ये दुसरा जामीन अर्ज आला तर तो ज्या न्यायाधीशांनी पहिल्या अर्जाचा आदेश दिलेला आहे. त्याच न्यायाधीशांकडे दुसरा अर्ज जाईल.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी काढलेल्या या कार्यालयीन आदेशामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्या न्यायालयात न्यायाच्या अपेक्षेने प्रलंबित असलेल्या जामीन अर्ज प्रकरणांना आता लवकर निकालाचा न्याय मिळेल अशी परिस्थिती तयार झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *