नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेतील यशवंत महाविद्यालयामध्ये विद्यावाचस्पती पदवी प्राप्त प्राध्यापक महिलेला प्राचार्याने शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.
नांदेड जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था यशवंत महाविद्यालय आहे. या कॉलेजची शिक्षण संस्था शारदा भवन शिक्षण सोसायटी आहे. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोक चव्हाण आहेत. या महाविद्यालयातील एका ४९ वर्षीय प्राध्यापीकेने दिलेल्या तक्रारीनुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी कॉलेजच्या एका शिक्षण विभागात त्या काम करत असतांना त्यांना शरीरसुखाची मागणी करून वाईट उद्देशाने त्यांचा उजवा हात धरुन त्यांचा विनयभंग केला आहे. (या कॉलेजचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांच्या नावासमोर डॉक्टर हा शब्दा लावला जातो म्हणजे त्यांनी सुध्दा विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त केलेली आहे.) हा सर्व प्रकार २५ जुलै रोजी दुपारी १ वाजता यशवंत महाविद्यालयाच्या एका भाषा विभागात घडला आहे. यशवंत महाविद्यालय सुध्दा पुर्णपणे सीसीटीव्ही फुटेजने कव्हर केलेले आहे.
प्राध्यापीकेने दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी २६ जुलै रोजी रात्री १० वाजता स्टेशन डायरी नोंद क्रमांक २३ नुसार गुन्हा क्रमांक २८२/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४(अ) नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक डॉ.एन.बी.काशीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.