नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्यातील चार पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती प्राप्त झाल्यानंतर त्यांना शुभकामना देतांना इतवाराचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे म्हणाले की, उर्वरीत राहिलेल्या सेवाकाळात अधिकारी म्हणून जगतांना तुमची जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीला पुर्ण करतांना जनतेमध्ये पोलीस दलाबद्दलची भावना उच्च स्तरावर पोहचविण्यासाठी प्रयत्न करा.
इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार घनशाम उत्तमराव चव्हाण, आनंदा प्रभाकर जोंधळे, प्रकाश सुरतराम चव्हाण आणि मोहन भिम राठोड या तीन सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती प्राप्त झाली. पोलीस ठाणे इतवारा येथे या सर्वांचा सत्कार करतांना पोलीस निरिक्षक भगवान धबडगे बोलत होते. याप्रसंगी वास्तव न्युज लाईव्हचे रामप्रसाद खंडेलवाल यांची पण उपस्थिती होती.
सत्कार करतांना भगवान धबडगे म्हणाले, पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकारी यामध्ये असलेले अंतर आपण आपल्या जीवनकाळात ओळखले आहे. आता साहेबांना विचारतो असे म्हणता येणार नाही. निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय घेतांना सर्व सामान्य जनतेच्या त्रासाला न्याय देता यावा हा भाव जागृत ठेवा म्हणजे आपल्या पोलीस दलाबद्दल जनतेमध्ये असलेल्या भावना बदलतील. पोलीस अधिकारी झाल्यानंतर आपल्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलणार आहे. ती बदललेली दृष्टी उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्न करा आणि आपली सेवानिवृत्त येण्याअगोदर अत्यंत ताठ मानेने सेवानिवृत्ती स्विकारण्याची तयारी करा. आपल्याकडे कोणी बोट दाखवले नाही पाहिजे ही एकच बाब लक्षात ठेवली तर पोलीस दलाचे काम उत्कृष्ट रितीने पार पाडता येते.

याप्रसंगी वास्तव न्युज लाईव्हचे रामप्रसाद खंडेलवाल यांनी सांगितले की, पत्रकारांशी संपर्क येतो तेंव्हा त्यांची अडचण समजून घेत जा. त्यांना आपण सर्वात प्रथम बातमी छापली पाहिजे ही घाई असते. पोलीस दलामध्ये साहेबांना विचारल्याशिवाय पत्रकारांना काही सांगता येणार नाही अशी प्रथा आहे. पण जे काही कागदावर आले आहे ते सांगण्यास काही हरकत नसते. कारण त्यावेळी तुमचा साहेब सुध्दा अत्यंत घाईमध्ये असतो. त्यामुळे तो तुम्हाला बोलत नाही आणि पत्रकारांना माहिती मिळत नाही आणि कोठे तरी ठिणगी पडते. या ठिणगीला वाचविण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या सहकाऱ्यांना सुध्दा याची समज द्या. जेणे करून पत्रकार आणि पोलीसांमध्ये कोठे ठिणगी पडणार नाही. पत्रकार हा घटनेचा मित्र असतो. त्याला त्या घटनेची बातमी लिहायची असते. त्या बातमीतुन तो घडलेली घटना समाजापर्यंत पोहचवत असतो. पत्रकारांना सुध्दा बातमी लिहिल्यानंतर अनेक त्रासांना सामोरे जावे लागते त्यावेळी ते तुमच्याकडे येतात. तेंव्हा मात्र त्यांना योग्य प्रतिसाद द्या उगीच मागे आमच्याविरुध्द बातमी लिहिली होती ही बाब लक्षात ठेवून त्या दिवशीच्या घटनेला दुर्लक्षीत करू नका.
