बिलोली सञ न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल
बिलोली(प्रतिनिधी)-देगलुर तालुक्यातील चैनपुर येथील रहिवासी दै.सोशल फाउंडेशनचा पञकार मयत संजय गोविंद वाघमारे (वाडीकर) यांचा खून करणारा मुख्य आरोपी मारोती झगडे याच्यासह इतर नऊ आरोपींना बिलोली येथील अति.जिल्हा सञ न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश ए.कोठलीकर यांनी दि. 29 जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.या निकालाने मयत संजय गोविंद वाघमारे (वाडीकर) यांच्या कुटुंबियांनी आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.
दैनिक सोशल फाउंडेशनचा पञकार मयत संजय गोविंद वाघमारे व या खुनातील मुख्य आरोपी मारोती झगडे यांच्यात गावा शेजारी असलेल्या तळ्यातील माती उपसा बाबात वारंवार वाद होत होता.यामुळे मुख्य आरोपी मारोती झगडे यांनी मयत संजय वाघमारे यास जिवे मारण्याची धमकीही देत होता.परंतु हा वाद माझ्या जिवावर बेतेल अशी पुसटशीही कल्पना नसलेला संजय वाघमारे हा दि.2 जुन 2018 रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास आपल्या घरासमोर बसलेला असताना आरोपींनी त्याच्या घरासमोर येऊन प्रथमतः डोळ्यावर मिरची पावडर फेकले.यात संजय वाघमारे डोळ्यात आग होत असल्याने डोळे चोळून घेण्यात मग्न असतांना आरोपींनी लाकडांनी संजय वाघमारे यास बेदम मारहाण केली.या मारहाणीत संजय वाघमारे याचा मृत्यू झाला होता.त्यानंतर मयताची पत्नी तथा या घटनेची प्रत्यक्ष साक्षिदार विजयालक्ष्मी यांनी वरील प्रमाणे मुख्य आरोपी मारोती पिराजी झगडे,दत्ताञय पिराजी वाघमारे,दिगांबर पिराजी वाघमारे,अशोक पिराजी वाघमारे,रमेश पुंडलिक वाघमारे,नामदेव पुंडलिक वाघमारे,गजानन नामदेव वाघमारे,सुधाकर नागोराव सोनकांबळे,मधुकर नागोराव सोनकांबळे,राहुल नागोराव सोनकांबळे या 10 आरोपीं विरूध्द देगलुर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती.त्यानुसार वरिल प्रमाणे आरोपीं विरूद्ध पोलिस स्थानकात विविध कलमान्वे गुन्हा दाखल झाला.दाखल झालेल्या गुन्ह्याचा परिपुर्ण तपास करून दोषारोपपञ अति.सञ न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आले होते.या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षिदार तपासण्यात आले.तसेच बचाव पक्षाकडूनसुद्धा कांही साक्षिदार तपासण्यात आले.न्यायालयाने साक्षी पुराव्याचा विचार करून दि.29 जुलै रोजी यातील 10 आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेसह 25 हजाराचा दंड ठोठावला आहे.सरकार पक्षातर्फे अँड.संदिप कुंडलवाडीकर यांनी बाजु मांडली असून यास पैरवी अधिकारी माधव पाटील यांनी सहकार्य केले.