नांदेड (प्रतिनिधी)- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2022 मध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांमध्ये त्वरीत सविस्तर माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठवावी असा ई-मेल संदेश आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्यभरातील पोलीस प्रमुखांना पाठविले आहे.
दि. 1 ऑगस्ट रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने ई-मेल पाठविलेल्या एका पत्रात राज्य निवडणूक आयोगाचे पत्र दि. 31 जुलै 2018, 28 फेब्रुवारी 2022, पोलीस महासंचालक कार्यालयाचे पत्र दि. 11 मार्च2022 असे संदर्भ यात जोडले आहेत. यानुसार आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महानगरपालिका – 23, नगर परिषदा – 208, नगर पंचायती – 13, जिल्हा परिषदा- 25, पंचायत समित्या – 284 आणि सुमारे 10 हजार ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या संदर्भीत पत्रानुसार त्यातील सुचना लक्षात घेतल्या तर ज्यांचा निवडणुक प्रक्रियेशी संबंध येतो, अशा विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या त्या नियमातील निकषानुसार करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या त्वरीत करायच्या आहेत. म्हणून निवडणूक आयोगाच्या निकषांमध्ये बसणारे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या सर्वांची माहिती अनुक्रमे डेक्स क्र. 1 ते डेक्स क्र. 5 ला त्वरीत प्रभावाने ई-मेलवर पाठवायची आहेत.
नांदेड जिल्ह्यात सुद्धा बदल्यांबाबत बऱ्याच चर्चा बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहेत. अधिकाऱ्यांसह पोलीस अंमलदारांच्या बदल्या होणे यासुद्धा अपेक्षीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोणत्या अधिकाऱ्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार बदलीच्या सदरात येतो किंवा तो वाचतो याबाबत स्पष्ट माहिती प्राप्त झाली आहे.