नांदेड (प्रतिनिधी)- एका मकोका प्रकरणात तांत्रिक मुद्यांना पुढे करून आरोपीसाठी मागितलेला नियमीत जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी नामंजूर करताना हा अर्ज न्यायासमक्ष असमर्थनीय (नॉट टेनेबल) असल्याचा मुद्या लिहून तो अर्ज फेटाळला आहे.
सन 2019 मध्ये इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या इंद्रपालसिंघ भाटीया यांच्यावर गोळीबार झाला होता.हा गुन्हा क्र. 273/2019 दि. 10 डिसेंबर 2019 रोजी दाखल झाला होता. या प्रकरणात कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधू याच्यासह एकूण 7 जणांची नावे होती, त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सुरूवातीला भारतीय दंड संहितेची कलमे होती, पुढे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) 1999च्या कलम 3 (1) (2), 3 (2), 3 (4) यांची वाढ झाली. आणि हा गुन्हा तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
पुढे या प्रकरणात पंजाब येथील काही जणांना अटक करण्यात आली. यातील एक आरोपी जामीन मिळाल्यानंतर फरार झालेला आहे. या प्रकरणात एक आरोपी जगजीतसिंघ उर्फ जग्गी चरणसिंघ संधू वय 34 याने मला अटक केल्यानंतर 91 दिवस झाले आहेत आणि माझे दोषोरोपपत्र दाखल झाले नाही, अशा तांत्रिक मुद्यावर नियमीत जामीन मागितला होता. या अर्जाबद्दल जगजीतसिंघ उर्फ जग्गीच्यावतीने ऍड. राजू कुलकर्णी यांनी सादरीकरण केले. या प्रकरणात आपला से देताना पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी जगजीतसिंघ उर्फ जग्गीला अटक होऊन फक्त 83 दिवस झाले आहेत, त्यामुळे त्याला जामीन देता येणार नाही. तसेच मकोका न्यायालयाने या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करण्याासाठी मुदतवाढ दिलेली आहे. सरकारच्यावतीने सादरीकरण करताना ऍड. यादव तळेगावकर यांनी मांडलेले मुद्ये लक्षात घेऊन न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी जगजीतसिंघ उर्फ जग्गीने मागितलेला नियमीत जामीन अर्ज फेटाळला आहे.