नांदेड (प्रतिनिधी)- भुखंडातील श्रीखंड खाण्यासाठी अनेक खलबते रचली जातात. त्यातून फुकटात भुखंड लाटले जातात. जेव्हा खऱ्या मालकांना लक्षात येते तोपर्यंत उशीर झालेला असतो. अशाच प्रकरणामध्ये नामांकित असलेल्या एका प्राचार्याला हरविंदर सिंघ उर्फ रिंदा या कुख्यात दहशतवाद्याने खंडणी मागितली होती. त्या प्राचार्यांच्या विरूद्ध पुढे गुन्हा दाखल झाला. त्यात एकूण 7 जणांची आरोपी या सदरात नावे आहेत. पण नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी प्राचार्यसह पाच जणांना काही अटींसह अटकपूूर्व जामीन मंजूर केला आहे.
नांदेड येथील जय मल्हार चौकात राहणारे गंगाराम रामराव खोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेत गट क्र. 265, सांगवीमध्ये असलेल्या एकूण 3 एकर 1 गुंठा या शेतजमीनीमधील 15 फूट रूंद आणि 200 फूट लांब शेतजमीन हडप करण्याच्या उद्देशाने सात जणांनी त्या जमिनीचे बनावट नकाशे तयार करून, शेतजमिनीचे बनावट वर्णन दाखवून माझी व मुद्रांक कार्यालयाची फसवणूक केली आहे. या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा क्र. 218/2022 भारतीय दंड संहितेचे कलम 420, 467, 468, 471, 384, 143, 427, 504 आणि 506 नुसार दाखल केला आहे. गुन्ह्यात सय्यद नसीम सय्यद अहेमद, मोहम्मद शहनावाज खान मोहम्मद नामद खान, शेख आबीद खाजामियॉ, रियाजोद्दीन वसीयोद्दीन मुजावर, शेख वसीम शेख चॉद, अकबर हुसेन आणि वसीयोद्दीन रियाजोद्दीन अशी सात नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास पुढे आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्याचा तपास सध्या पोलीस निरीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर करत आहेत.
या प्रकरणी प्राचार्य वसीयोद्दीन रियाजोद्दीन मुजावर यांच्यासह शेख आबीद खाजामियॉ, रहीयोद्दीन वसीयोद्दीन मुजावर, शेख वसीम शेख चॉद, शेख अकबर हुसेन अहेमद हुसेन अशा पाच जणांनी नांदेडच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज क्र. 602/2022 दाखल करून अटकपूर्व जामीन मागितला. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी या पाच जणांवर बऱ्याच शर्थी सुनिश्चित केल्या आहेत आणि त्यानुसार त्यांना अटकपूर्व जामीन दिला आहे.
या प्रकरणातील महत्वपूर्ण बाब अशी आहे की, या प्रकरणातील प्राचार्य वसीयोद्दीन रियाजोद्दीन मुजावर यांना काही दिवसांपुर्वी कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ संधू उर्फ रिंदा याचा फोन आला होता. माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत, असे सांगणाऱ्या या प्राचार्याविरूद्ध भुखंडातील श्रीखंड खाण्याच्या प्रकारात गुन्हा दाखल झालेला आहे. सध्यातरी त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2022/08/03/रिंदा-साहेबानीं-आपला-नंब/