घरगुती गॅस सिलेंडरचा वापर वाहनाचे इंधन म्हणून करणाऱ्या रॅकेटवर छापा

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तहसील कार्यालय आणि एलसीबीची संयुक्त कार्यवाही 

नांदेड (प्रतिनिधी)- घरगुती गॅस सिलेंडर बदलून त्याचा वापर वाहन इंधनात करणाऱ्या एका टोळीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.

तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपीक माधव विक्रम मोरे आज दि. 3 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेला लेखी पत्र दिल्यानंतर पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जसवंतसिंघ शाहू, पोलीस अंमलदार संजय केंद्रे, पदमसिंग कांबळे, शंकर केंद्रे हे तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपीक माधव मोरे यांच्यासोबत माळटेकडी परिसरातील एम.जी.आर. फॅंक्शन हॉलसमोर एका दोन शटरच्या दुकानात पोहचले. त्याठिकाणी भारत गॅस कंपनीचे काही घरगुती गॅस सिलेंडर, विद्युत मोटार, विद्युत वजनकाटा आणि घरगुती गॅस वाहनात भरण्यासाठी बनवलेल्या वेगवेगळ्या यंत्रणा सापडल्या. या संदर्भाचा सविस्तर पंचनामा करण्यात आला त्यात एकूण भरलेले सहा घरगुती गॅस सिलेंडर, 8 रिकामे सिलेंडर, 1.5 अश्वशक्तीचे एक मोटार, एक विद्युत वजनकाटा आणि वाहनात गॅस भरण्याची यंत्रणा असा 63 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दुसऱ्या दुकानात घरगुती वापराचे भरलेले 16 गॅस सिलेंडर आणि पुर्वीसारखेच इतर साहित्य असा 79 हजार रूपयांचा ऐवज मिळून दोन्ही दुकानांमधून 1 लाख 42 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नांदेड तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपीक माधव विक्रम मोरे यांच्या तक्रारीनुसार शेख अजीज शेख जब्बार वय 31, रा. दगडगाव ता. लोहा, सय्यद मुज्जमील सय्यद मैनोद्दीन वय 28 रा. खुदबईनगर, अंकुश श्रीराम ढवळे वय 27 रा. सिडको यांची नावे आरोपी सदरात लिहिली आहे. यांच्याविरूद्ध घरगुती गॅसचा वापर वाहनात इंधन म्हणून करण्याचा आरोप आहे. त्यांच्याविरूद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 3 आणि 7 नुसार ही तक्रार देण्यात आली आहे. पकडलेल्या आरोपींना तक्रारीसोबत नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *