नांदेडच्या ऍड. कपील पाटील यांनी राष्ट्रपतींकडे केली तक्रार
नांदेड(प्रतिनिधी)-दोन वर्षापुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शासकीय जाहिरातींमध्ये पंतप्रधानांचा फोटो छापत नाहीत अशी तक्रार करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आता शासकीय निधीचा गैरवापर करत शासकीय जाहिरातींमध्ये आपले फोटो जाहीरपणे छापत आहेत या संबंधाची एक तक्रार नांदेड ऍड. कपील पाटील यांनी राष्ट्रपतींकडे सादर केली आहे. त्यांचा अर्जाचा पावती क्रमांक पीआरएसईसी/ई/ 2022/23669 असा आहे.
14 मे 2015 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी दिलेल्या एका रिट याचिकेतील निकालात शासकीय जाहिरातींमध्ये त्या राज्याच्या असतील किंवा देशाच्या असतील त्यात राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश यांचेच फोटो वापरावेत असे आदेश दिले होते. शासकीय निधीचा हा गैर वापर आहे असे त्या निकालात म्हटले होते. असाच एक निकाल पुढे दि.18 मार्च 2016 रोजी पण आला. त्यात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर एन.माधवमेनन यांच्या अध्यक्षतेत एका समितीने निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता.
आजच्या अनेक वर्तमान पत्रांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे फोटो वापरून घरो घरी तिरंगा ही जाहिरात करण्यात आली आहे. या जाहिरातीच्या फोटोसह नांदेडचे ऍड. कपील पाटील यांनी राज्याच्या स्तरावर मुख्यमंत्री व्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र शासकीय जाहिरातींमध्ये वापरता येणार नाही असा उल्लेख अर्जात केला आहे. यापुढे तरी शासकीय निधीतून केल्या जाणाऱ्या अशा जाहिरातींमध्ये भारताचे राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती आणि पंतप्रधान तसेच राज्याच्या स्तरावर फक्त मुख्यमंत्री यांचे फोटो वापरूनच जाहिरातील प्रकाशीत कराव्यात असे निर्देश देण्याची विनंती केली आहे. ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे पालन होईल.
याबद्दल वास्तव न्युज लाईव्हशी बोलतांना ऍड. कपील पाटील म्हणाले सन 2020 मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असतांना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो महाराष्ट्रातील शासकीय जाहिरातींमध्ये वापरत नव्हते. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा आधार घेवून तक्रार केली होती. पण आता ते उपमुख्यमंत्री असतांना सुध्दा शासकीय जाहिरातीमध्ये आपल्या स्वत:चा फोटो वापरत आहेत ही अत्यंत दुर्देवी बाब आहे.
कधी तक्रार करणारे देवेंद्र फडणवीस आता आपलाच फोटो शासकीय जाहिरातींमध्ये वापरतात