शिक्षणविस्तार अधिकारी परमेश्र्वर गोणारे करतात हप्ता वसुली

नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांना एक शिक्षणविस्तार अधिकारी शिक्षकांना वेठीला धरुन त्यांच्याकडून हप्ता वसुली करतो अशी खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे.आज भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा समारोह साजरा होत असतांना आम्ही स्वतंत्र झालो आहोत काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

नांदेड पंचायत समितीमध्ये परमेश्र्वर गोणारे नावाचे शिक्षणविस्तार अधिकारी आहेत. मागील आठ वर्षापासून त्यांची बदली झालेली नाही. त्यांच्या कार्याक्षेत्रात वसरणी, सिडकोतील काही शाळा येतात. एका पिडीत शिक्षकाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, परमेश्र्वर गोणारे हे कधी तीन महिन्याला, कधी सहा महिन्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल बळीरामपुर येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून हप्ता वसुली करतात. हप्ता वसुलीचा दर मुख्याध्यापकासाठी 5 हजार रुपये आणि शिक्षकांसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये असा आहे. खरे तर शिक्षणविस्तार अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात हायस्कुलचे कामकाजच येत नाही. पण बऱ्याच जागी प्राथमिक शाळा आणि हायस्कुल एकत्रित असतात आणि याचाच फायदा परमेश्र्वर गोणारे हे घेतात. हप्ता मागण्यासाठीचे कारण असे सांगितले जाते की, तुमच्या कामात खोड काढली जाईल, तुम्हाला नोटीस काढली जाईल आणि या जाचाला कंटाळून शिक्षक मंडळी मागील अनेक वर्षापासून या हप्ता जाळ्यात अडकले आहेत. हप्ता वसुलीसाठी शाळेतीलच एका शिक्षकेचा बेकायदेशीर वापर सुध्दा होतो. माहिती देणाऱ्या शिक्षकाने सांगितले की, कोविड नंतर शाळा सुरू झाल्या होत्या.तेंव्हा तर प्रत्येकी 5 हजार रुपये शिक्षकाला आणि मुख्याध्यापकांना त्यापेक्षा दुप्पट हप्ता देण्यास भाग पाडले आहे. अशा या परिस्थितीची माहिती ही एका शाळेशी संबंधीत आहे. या शाळेत 16 शिक्षक आहेत. इतर शाळांची माहिती वास्तव न्युज लाईव्ह पेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी , बीडीओ यांनी घ्यायला हवी आणि त्यावर इलाज शोधायला हवा.

माहिती देणारे शिक्षक सांगत होते वरिष्ठ अधिकारी सुध्दा परमेश्र्वर गोणारेला घाबरतात. तो कोणत्या तरी संघटनेचा पदाधिकारी आहे आणि त्याच्या आधारे तो शिक्षणाधिकारी यांच्याविरुध्द उठाव करतो. म्हणून त्याच्या नादाला कशाला लागायचे असा विचार अधिकारी करतात असे त्या शिक्षकाला वाटते. भारत स्वातंत्र्य होवून आपण 75 वा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. आम्ही स्वतंत्र होवून 75 वर्ष झाली आहेत. पण परमेश्र्वर गोणारेच्या हप्ता वसुलीचा विचार केला तर आम्ही कधी स्वतंत्र होवू हा प्रश्न मात्र आ वासुन उभा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *