घरी परतणाऱ्या पेट्रोलपंप मालकाची लुट

अर्धापूर(प्रतिनिधी)- अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोलपंपाचे मालक पेट्रोल पंपावर जमलेली रोख रक्कम घेवून रात्री घरी जात असतांना दोन दुचाकी गाड्यांवर आलेल्या चार दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करून 1 लाख 88 हजार 60 रुपयांची लुट केली आहे.
अर्धापूर जवळ जांभरून पाटीच्या पुढे दुध डेअरीसमोर मोहम्मद मुस्तफा अली खान मोहम्मद अली खान तडवी हे 25 ऑगस्ट रोजी आपल्या पेट्रोलपंपावर गेले. तेथे पेट्रोल व डिझेल विक्री करून जमा असलेले 1 लाख 71 हजार 60 रुपये अशी रक्कम घेवून रात्री घरी, किल्ला रोड नांदेडकडे परत येत असतांना जवळपास रात्री 10 वाजेच्यासुमारास दोन दुचाकी गाड्यांवर चार चोरटे आले. त्यांना मोटारसायकलसमोर आपली मोटारसायकल उभी करून दरोडेखोरांनी रोखले. त्यांच्या हातावर खंजीरने मारहाण केली आणि त्यांच्या बॅगमधील 1 लाख 71 हजार 60 रुपये आणि त्यांच्याकडील 17 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल बळजबरीने चोरून नेले आहेत.
हा गुन्हा 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.48 वाजता दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 394 जोडण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा क्रमांक 250/2022 आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *