नांदेड(प्रतिनिधी)-मकोका कायद्याअंतर्गत तुरूंगात असणाऱ्या गॅंगस्टर नितीन बिघाणीया आणि कैलास बिघाणीया यांची बहिण ज्योती बिघाणीयाला जामीन मंजुर झाला आहे.
दि.22 जुलै 2021 रोजी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्की ठाकूर या युवकाचा खून झाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी मुस्लीम बंधू घालतात तशा टोप्या वापरल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ईद हा सण होता. पण पोलीसांनी या गुन्ह्याची हकीकत दोन तासातच उघड केली आणि कांही जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर जवळपास 12 जण या गुन्ह्यात आरोपी म्हणून अडकले आणि त्यांच्याविरुध्द मकोका कायद्याची कार्यवाही झाली. त्यामध्ये गॅँगस्टर नितीन बिघाणीया आणि कैलास बिघाणीया यांची बहिण ज्योती बिघाणीया यांचे पण नाव आहे.
मकोका कायद्याअंतर्गत कार्यवाही मंजुर झाल्यानंतर हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात होते. हा गुन्हा क्रमांक 176/2021 इतवारा पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे. याबाबत ऍड.शिवराज पाटील यांनी ज्योती बिघाणीया यांची बाजू मांडतांना न्यायालयात सादरीकरण केले की, ज्यावेळी खूनाची घटना घडली त्यावेळी ज्योती बिघाणीया घटनास्थळावर हजर नव्हत्या. ज्योती बिघाणीयावर यापुर्वीचा कोणताही गुन्हा नोंद नाही फक्त ती नितीन बिघाणीयाची बहिण असल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. अशा परिस्थितीत तिच्याविरुध्द मकोकाअंतर्गत कार्यवाही होवू शकत नाही. या युक्तीवादानंतर न्यायालयाने ज्योती बिघाणीयाला जामीन मंजुर केला असल्याची माहिती ऍड.शिवराज पाटील यांनी दिली. त्यांच्यासोबत ऍड.भगवान कदम, ऍड.बाळासाहेब कांबळे, ऍड.नयुम पठाण यांनी सुध्दा परिश्रम घेतले.
मकोका कायद्याअंतर्गत ज्योती बिघाणीयाला जामीन